Corona virus : प्राण्यांवर देखील कोरोना संसर्गाबाबत विशेष संशोधन करण्याची गरज 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2020 07:09 PM2020-04-08T19:09:20+5:302020-04-08T19:18:39+5:30

कोरोना विषाणूने आता वन्य प्राण्यांनाही विळखा घातल्याचे समोर

Corona virus : Research will be also need on Animals about corona infection | Corona virus : प्राण्यांवर देखील कोरोना संसर्गाबाबत विशेष संशोधन करण्याची गरज 

Corona virus : प्राण्यांवर देखील कोरोना संसर्गाबाबत विशेष संशोधन करण्याची गरज 

Next
ठळक मुद्देसर्व प्राणीसंग्रहालये तसेच अभयारण्यातील प्राण्यांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन सर्व बंदिस्त प्राण्यांवर  सीसीटीव्हीच्या माध्यमातून २४ तास लक्ष ठेवण्याचे आदेश

पुणे : जगभरातील मानवसमुहाला भयग्रस्त केल्यानंतर कोरोना विषाणूने आता वन्य प्राण्यांनाही विळखा घातल्याचे समोर येते आहे. न्यूयॉर्कमधील ब्रान्क्स प्राणी संग्रहालयातील एका वाघिणीला कोरोना झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर भारतातील प्राणीप्रेमी संघटनाही सतर्क झाल्या आहेत. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणानेही याची दखल घेत देशातील सर्व प्राणी संग्रहालयांना हाय अ‍लर्ट जाहीर केला आहे.

' बायोस्फिअर्स ' या वन्य जीव व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनेने केंद्र व राज्य सरकारला एक निवेदन देत देशातील सर्व प्राणीसंग्रहालये तसेच अभयारण्यातील वन्य प्राण्यांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय प्राधिकरणाच्या पत्रात सर्व बंदिस्त प्राण्यांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून २४ तास लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, नवी दिल्ली कार्यालयातून देखील वाघाला झालेल्या कोरोना संसगार्ची पार्श्वभूमी लक्षात घेता भारतातील अनेक व्याघ्र संशोधन संस्था व संरक्षित वनांसाठी काही महत्वाच्या गोष्टींची  काळजी घेण्यास सुचवले आहे. त्यासाठीच्या उपायांची त्वरीत अंमलबजावणी करण्यासही सांगण्यात आले आहे.
 बायोस्फिअर्स संस्थेचे प्रमुख पदाधिकारी सचिन पुणेकर म्हणाले,जगभरातून यापुर्वीच प्राणी व कोरोना संसर्ग या विषयावर अत्यंत महत्वाचे संशोधन प्रकाशित झाले आहे. कुत्री, मांजर, फेरेट, खवले मांजर, वाघळ, या प्राण्यांमध्ये कोरोना संक्रमीत होतो असे या संशोधनातून निदर्शनास आले आहे. कालांतराने हे प्राणी कोरोनाविषाणूचे वाहक होतात. यावर अधिक संशोधन होण्याची गरज असून त्यापुर्वी काळजी म्हणून पाळीव तसेच वन्य प्राण्यांवरही लक्ष ठेवण्याची गरज आहे. यासंबधी संस्थेने वन्य जीव विषयाशी संबधित केंद्र व राज्य सरकारच्या मंत्रालयाला सविस्तर पत्र पाठवले असल्याची माहिती पुणेकर यांनी दिली.
 या पत्रात जगभरातील प्राणी व कोरोनासंसर्ग या विषयावरील संशोधनाची मीमांसा केलेली आहे. तसेच भारत सरकारने स्थानिक, राज्य व देश पातळीवर वाघाबरोबर प्राणी संग्रहालयातील इतर बंदिस्त प्राणी (बिबट्या, सिंह, इतर मार्जार कुळातील प्राणी), खवले मांजर, भटकी कुत्री, पाळीव मांजर व पेट हाउस मधल्या फेरेट आणि  भारतभर वन्य अधिवासांमधे आढळणारे मुस्टेलिडी कुळातील चांदी अस्वल, पाण-मांजर, विजल, मार्टिन, या प्राण्यांवरही कोरोना संसर्गाबाबत विशेष संशोधन करण्याची गरज आहे असे मत पुणेकर यांनी व्यक्त केले.
भटकी कुत्री, पाळीव मांजर हे मनुष्यवस्तीत मोठ्या प्रमाणात असतात. त्यांना या विषाणूने बाधीत केले तर मानवसमुहावर मोठीच आपत्ती येण्याची ते जर या विषाणूने बाधित असतील तर मोठ्या आपत्तीचा धोका आहे. त्यामुळे या प्राण्यांवरही संशोधन व्हावे. या कामाची व्याप्ती बघता देशभर स्थानिक पातळीवर या चाचण्या, नमुने गोळा-करण्यासाठी, संशोधन करण्यासाठी विविध विषयातील तज्ञ मंडळी, अनुभवी शासकीय अधिकारी यांची समिती किंवा विशेष गट स्थापन करावेत अशी मागणी केंद्रीय तसेच राज्य पर्यावरण मंत्रायलयांकडे व या विषयाशी संबधित विविध संस्थांच्या प्रमुखांकडे केली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. वैभव माथुर यांनी या पत्राची दखल घेतली असल्याचे पुणेकर यांनी सांगितले. 

Web Title: Corona virus : Research will be also need on Animals about corona infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.