corona virus : निवासी डॉक्टरांनाही वाढीव मानधन द्या, सत्यजित तांबेंची ठाकरे सरकारकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 07:38 PM2020-06-01T19:38:22+5:302020-06-01T19:38:51+5:30
वाढीव विद्यावेतनाच्या प्रश्नामध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पुढाकार घेत राज्यशासनाने तातडीने हा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली आहे.
मुंबईः निवासी डॉक्टरांना सर्वात कमी विद्यावेतन देणाऱ्या राज्यांपैकी महाराष्ट्र राज्य असल्याने बऱ्याच काळापासून वाढीव विद्यावेतनासाठी विविध आंदोलने बऱ्याच काळापासून डॉक्टर संघटना करत आहेत. परंतु अजूनही हा प्रश्न अनुत्तरितच आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या डॉक्टरांच्या वाढीव विद्यावेतनाच्या प्रश्नामध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पुढाकार घेत राज्यशासनाने तातडीने हा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली आहे.
कोरोनाशी लढा देण्यासाठी महाराष्ट्राने इतर राज्यातील एमबीबीएस डॉक्टर पाचारण केले असून, त्यांना 50 हजार ते 2 लाख रुपये असे भरघोस वेतन तर सक्तीची सेवा करणाऱ्या डॉक्टरांना 15 हजार रुपयांचे वाढीव मानधन मिळत असताना निवासी डॉक्टरांसाठी अशी काही तरतूद नसल्याकडे तांबे यांनी लक्ष वेधले आहे. MD च्या कोर्सेस अंतर्गत निवासी डॉक्टरांना सर्वात कमी विद्यावेतन देणाऱ्या राज्यांपैकी महाराष्ट्र राज्य आहे.
दुसरे म्हणजे कोरोनाच्या काळात इतर डॉक्टरांप्रमाणे अतिरिक्त मानधन मिळत नसल्याने या निवासी डॉक्टरांमध्ये प्रशासनाकडून अन्यायाची आणि गृहीत धरल्याची भावना वाढत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी सत्यजीत तांबे यांनी केली आहे.