Corona virus :लॉकडाऊन काळात दाखल झालेले गुन्हे मागे घ्या; मनसेचे गृहमंत्र्यांना निवेदन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 07:02 PM2020-06-18T19:02:17+5:302020-06-18T20:05:46+5:30
लॉकडाऊन काळात राज्यात 1 लाख 30 हजार 396 गुन्हे दाखल
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर कलम १८८ नुसार जोरदार कारवाया राज्यभरात सुरू करण्यात आल्या होत्या. या कालावधीत राज्यभरात १ लाख ३० हजार ३९६ गुन्हे दाखल करण्यात आले असून २६ हजार लोकांना अटक करण्यात आली आहे. या सर्वांच्या भवितव्याचा विचार करून हे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. मनसेच्या महिलाध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे.
कोविड १९ विषाणूचा संसर्ग वाढू नये याकरिता संचारबंदी लागू करण्यात आली होती. ती अद्यापही कायम आहे. नागरिकांनी एकत्र येणे टाळावे याकरिता शासनाने नागरिकांना बाहेर फिरण्यास तसेच कार्यालये, व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांसह नागरिकांवर कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येत होती. पोलिसांनी याकाळात नागरिकांवर मोठ्या प्रमाणावर खटले भरले. हे खटले मागे घ्यावेत अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनच्या काळात २२ मार्च ते १५ जून या कालावधीत कलम १८८ नुसार तब्बल १ लाख ३० हजार ३९६ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच, २६ हजार ८८७ व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे. कोरोनामुळे आधीच सर्वसामान्यांची खूप हेळसांड झालेली आहे. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत त्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. अनेकजण त्यांच्या सरकारी किंवा खासगी नोकरीवर अवलंबून आहेत. त्यांच्यावर दाखल झालेल्या फौजदारी गुन्ह्यांमुळे त्यांच्या नोकरीस धोका व अडचण निर्माण होऊन रोजगाराची समस्या उद्भवू शकते. आधीच महाराष्ट्रातील रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यात कोरोना मधील या केसेस म्हणजे लोकांचे मरण अशी स्थिती होईल. हे गुन्हे मागे घेऊन या नागरिकांना दिलासा देण्याची मागणी मनसेने केली आहे.
गृहमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या पत्राच्या प्रति मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.