Corona virus : कोरोनाला रोखण्यासाठी चाचण्या वाढविणे आणि रूग्णांचे विलगीकरण गरजेचे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 05:34 PM2020-04-21T17:34:57+5:302020-04-21T17:39:52+5:30
संसर्ग कमी करण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा..
पुणे : लॉकडाऊनमुळे कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर मंदावला आहे. पण मोठ्या कालावधीच्या लॉकडाऊनचा फायदा होण्यासाठी त्याला मोठ्या प्रमाणावर केलेल्या चाचण्या आणि आढळून आलेल्या रूग्णांचे विलगीकरण यांचीही जोड गरजेची आहे. चाचण्या वाढविल्यामुळे बाधित लोक अधिक प्रमाणावर समोर येतील. त्यामुळे संसर्ग आटोक्यात आणता येऊ शकेल, असा निष्कर्ष 'इंडियन सायंटिस्ट्स रिस्पॉन्स टू कोविड' या शास्त्रज्ञांच्या गटाने काढला आहे. या गटाने विकसित केलेल्या इंडिया-सिम या गणितीय प्रतिमानानुसार करण्यात आलेल्या अभ्यासातून हा निष्कर्ष निघाला आहे.
कोरोनाशी लढण्यासाठी सुरू केलेल्या विविध प्रयत्न करणे तसेच कोरोना प्रसाराचे गणिती प्रतिमान तयार करण्यासाठी 'इंडियन सायंटिस्ट्स रिस्पॉन्स टू कोविड' या गटाची स्थापना करण्यात आली आहे. देशातील अनेक राष्ट्रीय संशोधन संस्था आणि विद्यापीठांमधील आघाडीच्या संशोधकांचा यामध्ये समावेश आहे. यातील गणिती प्रतिमानाचे काम करणाऱ्या उपगटाचे नेतृत्व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेंटर फॉर मॉडेलिंग अँड सिम्युलेशनचे (सीएमएस) डॉ. भालचंद्र पुजारी आणि डॉ. स्नेहल शेकटकर हे करत आहेत. चेन्नई येथील गणितीय विज्ञान संस्था आणि बेंगालूरू येथील भारतीय विज्ञान संस्था यांच्या शास्त्रज्ञांचा देखिल या गटात समावेश आहे. या गटाने ' इंडिया सिम' हे भारतातील रोगप्रसाराचा अभ्यास करण्यासाठीचे गणितीय प्रतिमान विकसित करण्यात आले असून, भारतासाठीचे आत्तापर्यंतचे हे सर्वांत व्यापक प्रतिमान आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली.
या प्रतिमानाचा उपयोग शहरे, जिल्हे आणि राज्य अशा विविध पातळ्यांवर आरोग्यसेवांशी संबंधित संसाधनांचे आणि विविध उपाययोजनांचे नियोजन करण्यासाठी करता येणार आहे. त्यासाठीचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. साथीवर वेगवेगळ्या प्रकारचे लॉकडाउन, संशयित किंवा बाधीतांचे विलगीकरण, रोगाच्या चाचण्यांची संख्या इत्यादी गोष्टींचा कसा परिणाम होऊ शकेल याची तुलना करणे शक्य होणार आहे. प्रतिमानामुळे पुढे आपल्याला किती खाटांची आणि अतिदक्षता विभागांची गरज पडेल याचा अंदाज बांधता येणार आहे.
-------------------
संसर्ग कमी करण्यासाठी लॉकडाऊन गरजेचा आहे. पण केवळ जास्त कालावधीचा लॉकडाऊन असल्याने संसर्ग थांबणार नाही. त्यासाठी ठराविक झोनमधील चाचण्या मोठ्या प्रमाणावर कराव्या लागतील. चाचण्या केल्यामुळे बाधित रुग्ण समोर येतील. ते जेवढे जास्त आढळतील, तेवढे संसर्ग कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. त्यांची चाचणी केली नाही, तर ते इतरांना बाधित करण्याचा धोका असतो. त्यांच्यामुळे ही साखळी आणखी वाढत जाते. त्यामुळे लोकांना शोधून त्यांच्या चाचण्या करायला हव्यात. तरच लॉकडाऊनचा कालावधी कमी करता येईल. याचप्रमाणे ग्रीन झोनमधील लॉकडाऊनची स्थिती, वाहतुक यंत्रणा, शहरी, निमशहरी व ग्रामीण भागातील संसर्ग, सुविधा आदी बाबींचाही अभ्यास केला जात आहे.
- डॉ. स्नेहल शेकटकर
सदस्य, इंडियन सायंटिस्ट्स रिस्पॉन्स टू कोविड
---------------------—