राज्यातील नियोजित लसीकरण मोहीम रद्द नाही; आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 08:54 AM2021-01-17T08:54:46+5:302021-01-17T08:56:48+5:30
तांत्रिक अडचणींमुळे लसीकरण मोहीम १८ जानेवारीपर्यंत स्थगित करण्याचं वृत्त माध्यमांमधून झालं होतं प्रकाशित
गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना प्रतिबंधात्मक लस केव्हा उपलब्ध होणार याची प्रतीक्षा होती. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं दोन लसींना परवानगी दिल्यानंतर शनिवारपासून देशभरात लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मोहिमेचा प्रारंभ केला. तर दुसरीकडे राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या मोहिमेचा शुभारंभ केला. मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर शनिवारपासून देशातील अन्य भागांसह मुंबईत कोरोनावरील लसीकरणाला सुरुवात झाली. पहिल्या दिवशीचे लसीकरण सुरळीत पार पडलं. परंतु त्यानंतर काही तांत्रिक अडचणींमुळे लसीकरण रद्द केल्याचं वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं होतं. परंतु ही मोहीम रद्द केली नसल्याचा खुलासा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे.
"महाराष्ट्रातआरोग्य विभागातर्फे नियोजित असलेले कोणतेही कोरोना लसीकरण सत्र रद्द करण्यात आलेले नाही. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील आठवड्यामध्ये चार दिवस लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे," असं स्पष्टीकरण सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आलं आहे.
कोरोना लसीकरणाची नोंदणी ठेवणाऱ्या को-विनअॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हे लसीकरण रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. कोरोनाविरोधातील लसीकरणाची नोंदणी ठेवणारे को-विन हे अॅप डाऊन झाले आहे. तसेच लसीकरणाच्या ऑफलाइन नोंदणीस सध्या मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे या तांत्रिक बिघाडामुळे रविवारी आणि सोमवारी होणारी लसीकरणाची मोहीम रद्द करावी लागल्याचं वृत्त काही माध्यमांमधून प्रसिद्ध करण्यात आलं होतं.