कोरोनाचे सावट, तरीही कोकण किनारे गजबजले, ठिकठिकाणी पर्यटकांची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 06:37 AM2021-12-31T06:37:38+5:302021-12-31T06:38:14+5:30
Tourists : ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारने कडक केलेले निर्बंध पाळून नववर्ष स्वागताची धूम साजरी करण्यासाठी पर्यटक सज्ज झाल्याचे चित्र आहे.
सिंधुदुर्ग : सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी कोकणातील सागर किनारे गजबजून गेले आहेत. ओमायक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारने कडक केलेले निर्बंध पाळून नववर्ष स्वागताची धूम साजरी करण्यासाठी पर्यटक सज्ज झाल्याचे चित्र आहे.
सिंधुदुर्गमधील तारकर्ली, देवबाग, भोगवे, निवती, शिरोडा, कोंडुरा, खवणे, आचरा, देवगड, कुणकेश्वर, मिठमुंबरी या समुद्रकिनारी पर्यटक मोठ्या संख्येने आले आहेत. वाॅटर स्पोर्ट्स, समुद्राच्या पाण्यात भिजण्याची मज्जासुद्धा अनेक पर्यटक घेताना दिसत आहेत. बच्चे कंपनीबरोबरच त्यांचे पालकही समुद्र किनाऱ्यावर मस्त बागडताना दिसत आहेत.
पालघरच्या समुद्र किनाऱ्यावरही गर्दी
पालघर/बोर्डी : पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू आणि तलासरी या किनाऱ्यांंवर पर्यटकांची गर्दी दिसत आहे. सेलिब्रेशन पार्ट्यांवर नियमांचे बंधन असल्याने येथील हॉटेलचालकांनी कार्यक्रमच रद्द केल्याचे सांगितले. शिवाय रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत संचारबंदी असल्याने समुद्रकिनारी व सुरू बागांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांवर स्थानिक पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर आहे. दमण व सेलव्हासा येथून येणाऱ्या अवैध दारूवर सीमा भागात कडक कारवाई सुरू आहे.
नियमावलीबाबत पोलीस दक्ष
नाताळ, थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाचे स्वागत यासाठी सुमारे पाच लाख पर्यटक जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळी दाखल झाले आहेत.
पर्यटकांकडून एमटीडीसीच्या निवासस्थानांना प्राधान्य दिले जात असल्याने जिल्ह्यातील ही निवासस्थाने १०० टक्के भरलेली आहेत.
ओमायक्राॅनच्या अनुषंगाने नियमावली जाहीर करण्यात आली असून, त्याची काटेकोर अंमलबजावणी पोलीस करीत आहेत.