राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण ७.४१ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 02:04 AM2020-04-14T02:04:03+5:302020-04-14T02:04:43+5:30
रुग्ण बरे होण्यात राज्य अव्वल : ‘पॉझिटिव्ह’ प्रमाण एक टक्क्याने घटले
मुंबई/औरंगाबाद : राज्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण आठवडाभरात १.४० टक्क्याने वाढून ७.४१ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्या तुलनेत जागतिक व देशातील मृत्यूचे प्रमाणही ०.७१ टक्क्याने वाढले. जागतिक प्रमाणापेक्षा महाराष्ट्राचे मृत्यूचे प्रमाण अधिक आढळून आले. राज्यातील होत असलेल्या तपासण्यांतून पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण ५ वरून ४ टक्के झाले आहे.
महाराष्ट्रात सध्या देशातील कोरोना बाधितांची संख्या आणि कोरोना मृत्यूचा आकडा सर्वाधिक असताना रुग्ण बरे होण्याची संख्याही राज्यातच सर्वाधिक असल्याचे सोमवारी समोर आलेल्या राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या विश्लेषण अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार, गेल्या आठवड्यापर्यंत एकही मृत्यू नसलेल्या झारखंडमध्ये दोन मृत्यू होऊन मृत्यूचे प्रमाण १०.५३ टक्के होऊन अव्वल स्थानी आले. त्यानंतर महाराष्ट्र, पंजाब, मध्यप्रदेश, गुजरात आहे. राज्यात आढळून आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांत महिला ३९ तर पुरुष ६१ टक्के आहेत. त्यात महिलांतील मृत्यूचे प्रमाण ३३ तर पुरुषांतील ६७ टक्के आहे. शासकीय प्रयोगशाळांच्या २२ हजार ७०७ मधून १२३३ रुग्ण तर १७ हजार १८ स्वॅबमधून ५२८ रुग्ण खाजगी प्रयोगशाळांच्या तपासण्यांतून पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले. यापैकी २ टक्के रुग्ण क्रिटिकल असून १४ टक्के रुग्ण बरे झाले.
शंभरीपारही एक कोरोनाबाधित
१- १० वयोगटामध्ये ६६ रुग्ण असून, हे प्रमाण ३.७५ टक्के, ११-२० वयोगटामध्ये १२७ रुग्ण, २१-३० वयोगटामध्ये ३५१, ३१-४० वयोगटामध्ये ३२८, ४१-५० वयोगटामध्ये ३५२, ५१-६० वयोगटामध्ये २७५, ६१-७० वयोगटामध्ये १७०, ७१-८० वयोगटामध्ये ६७, ८१-९० वयोगटामध्ये २०, ९१-१०० वयोगटामध्ये ४, १०१-११० वयोगटामध्ये १ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे अहवालात म्हटले आहे. यात प्रामुख्याने विशीत १९.३३ टक्के, तिशीत १८.६३, चाळिशीत १९.९९ तर पन्नाशीतील १५.६२ टक्के प्रमाण आहे.