पश्चिम वऱ्हाडात कोरोनाचा पहिला बळी; बुलडाण्यात मृत्यू झालेला रुग्ण ‘पॉझिटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 02:16 PM2020-03-29T14:16:44+5:302020-03-29T17:21:16+5:30
पश्चिम वºहाडातील हा पहिलाच बळी ठरला असून, त्यामुळे तिन्ही जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
बुलडाणा : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी आयसोलेशन कक्षात दाखल केल्याच्या तासाभरात मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृत्यू कोरोना आजारानेच झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले. नागपूर येथील प्रयोगशाळेचा अहवाल रविवारी प्राप्त झाला असून, सदर रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे अहवालावरून स्पष्ट होत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्स डॉ. प्रेमचंद पंडित यांनी सांगितले. पश्चिम वºहाडातील हा पहिलाच बळी ठरला असून, त्यामुळे तिन्ही जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी सकाळी ठेवण्यात आलेल्या एका व्यक्तीचा अवघ्या तासाभरातच उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. मृत पावलेल्या व्यक्तीला निमोनिया झाला होता. तो अधिक वाढल्यामुळे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, परदेश दौऱ्याची तशी या रुग्णाची कुठलीही हिस्ट्री नव्हती. या मृत व्यक्तीचे स्वॅब नमुने ‘हार्ड अॅन्ड फास्ट’ तत्वावर नागपूर येथे पाठविण्यात आले होते. नागपूर येथून अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर रुग्णास कोरोनाची लागन झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे.
मृत व्यक्ती ही बुलडाणा शहरातीलच असून ती वयोवृद्ध नव्हती. बुलडाणा शहरातीलच एका खासगी रुग्णालयामध्ये गेल्या दोन दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांचा निमोनिया हा अधिकच वाढत गेला. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली होती. परिणामी २८ मार्च रोजी सकाळी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात आलेल्या ९२ परदेशी नागरिकांची तपासणी करण्यात आलेली असून यापूर्वी नागपूर येथे पाठविण्यात आलेल्या ११ जणांचे स्वॅब नमुनेही निगेटीव्ह आले होते.