राज्य राखीव पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव; ३ जण पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 06:41 PM2020-04-23T18:41:25+5:302020-04-23T18:55:58+5:30
मुंबई पोलिसांच्या मदतीला पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक २ ची एक कंपनीत बंदोबस्तासाठी गेली होती.
पुणे : पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक २ मध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. मुंबईला बंदोबस्तांसाठी गेलेल्या एका कंपनीतील तिघे जवान पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्यासह सर्व कंपनीला पुण्यात क्वारंटाईन करण्यात आले आहे. मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
मुंबई पोलिसांच्या मदतीला पुण्यातील राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक २ ची एक कंपनीत बंदोबस्तासाठी गेली होती. या कंपनीतील १०० जवान तीन दिवसांपूर्वी पुण्यात परत आले. या सर्वांना प्रशासनाने वेगळे ठेवले आहे. त्यातील तिघांना थंडी, ताप जाणवल्याने त्यांची तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता पुन्हा सर्व जवानांची तपासणी शुक्रवारी करण्यात येणार आहे. या सर्व जवानांना रामटेकडी येथील गट क्रमांक २ च्या अलंकरण हॉलमध्ये ठेवण्यात आले आहे. तसेच महापालिकेच्या एका शाळेमध्ये त्यांना विलगीकरण करुन ठेवले आहे. त्या ठिकाणी गैरसोय असल्याच्या तक्रारी या त्यांच्या नातेवाईकांकडे करीत आहे. त्यात बुधवारी त्यातील तिघे जण पॉझिटिव्ह आढळल्याने या जवानांमध्ये व त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीती निर्माण झाली आहे़.
याबाबत राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक २ चे सहायक समादेशक लक्ष्मण उत्तेकर यांनी सांगितले की, मुंबईमध्ये बंदोबस्तासाठी गेलेली एक कंपनी २० एप्रिल रोजी दुपारी पुण्यात परत आली. या सर्वांची पुण्यात आल्या आल्या त्यांच्या ३ टीम तयार करुन वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यांची राहण्याची सोय २ मोठ्या हॉलमध्ये करण्यात आली आहे. त्या ठिकाणी सर्वसुविधा आहेत. ८ टॉयलेट आहेत. तसेच मोठ्या मंडपात एकावेळी १० जण अंघोळ करु शकतील अशी सोय आहे. तसेच महापालिकेची एक शाळा घेण्यात आली असून तेथे काहीजणांची सोय केली आहे. आतापर्यंत गेल्या तीन दिवसात त्यांची तीन वेळा तपासणी केली गेली आहे. त्यात सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. काल तिघा जणांना थंडी, ताप वाजत असल्याने त्यांच्यात लक्षणे दिसू लागल्याने त्यांची चाचणी केली असता ते कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यांना वेगळे करुन उपचार सुरु करण्यात आले आहे. या सर्व जवानांची शुक्रवारी पुन्हा तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक प्लॅटूनमधील २० जणांची एक टीम तयार करुन त्यांना कोंढव्यातील हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणार आहे़ तेथे त्यांची तपासणी होणार आहे़.
...........
मुंबईला बंदोबस्तासाठी गेलेले तिघे जवान पॉझिटिव्ह
सर्व जवान सोशल डिस्टन्सिंग पाळत आहे ना यावर देखरेख असते. त्यांनी काय काळजी घ्यावी, याच्या सूचना दिल्या आहेत. ते एकत्र गप्पा मारत बसू नये म्हणून परिसरात बंदोबस्त ठेवला आहे. तसेच सर्व जवानांकडून सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत योगा करुन घेतला जातो. त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविल्या जात असल्याचे उत्तेकर यांनी सांगितले.
.............