कोरोनाचा काळ! स्तनदा मातांसाठी स्तनपानाची मार्गदर्शक तत्त्वे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 05:22 AM2020-06-06T05:22:09+5:302020-06-06T05:22:32+5:30
बाळंतपण झाल्यावर आई आणि बाळाला एकत्र ठेवता येईल. तसेच लगेचच स्तनपान सुरू करता येईल.
- अमोल अन्नदाते,
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)
कुठलीही लक्षणे नसलेल्या व कोरोना नसलेल्या आईने नियमित जसे आपण स्तनपान करतो तसे मास्क न घालता स्तनपान केले तरी चालेल. फक्त बाळाला हाताळताना आधी हात धुणे व मगच बाळाला जवळ घेणे. स्तनदा मातांना इतरांपासून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे.
आई कोरोना संशयित / कोरोनाबाधित असल्यास व लक्षणविरहीत / सौम्य लक्षणे असल्यास-
बाळांतपण झाल्यावर आई आणि बाळाला एकत्र ठेवता येईल. तसेच लगेचच स्तनपान सुरू करता येईल. तिने नेहमी करतात तसे स्तनपान सुरू ठेवावे. आईच्या दुधातून कोरोनाची बाधा होत नाही. स्तनपान करताना आईने मास्क वापरावा. दोन वर्षांपर्यंतच्या मुलांना मात्र मास्क वापरू नये. शक्यतो बाळ व आईचा एखाद्या मदतनिसाशिवाय इतरांशी संपर्क नको. आईला मदत करणाऱ्या मदतनिसाने मास्क, ग्लोव्हज, मेडिकल गाऊन वापरावा व आईशी कमीत कमी संपर्क ठेवावा.
आईने दर सहा ते आठ तासांनी मास्क बदलावा. आईला कोरोना असला तरी तिच्या दुधातून बाळाला संरक्षण देणाºया अँटीबॉडीज जातात.
बाळाला दर वेळेला स्तनपानासाठी घेताना २० सेकंद तरी साबणाने हात धुवावे व हँड सॅनिटायजरचा वापर करावा.
आई कोरोनाबाधित असून तीव्र लक्षणे असल्यास -
आईला खोकल्याचा त्रास असल्यास ही ती मास्कचा वापर करून कोणाच्या तरी मदतीने स्तनपान चालू ठेवू शकते. पण अशा स्थितीत आईला स्तनपान चालू ठेवणे त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे अशा वेळी परिस्थितीचा अंदाज घेऊन बालरोगतज्ज्ञ, आई व नातेवाईकांनी चर्चा करून दोनपैकी एक निर्णय घ्यावा. पहिला पर्याय आईने वाटीमध्ये दूध काढून द्यावे व ते इतराने बाळाला वाटी चमचाने पाजावे किंवा आईला सोयीस्कर काय आहे व तिची स्थिती बघून पावडरचे दूध अपवादात्मक स्थितीत वापरता येईल. नवजातशिशू व लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला तरी तो सौम्य किंवा लक्षणविरहीत असतो. म्हणून त्यांना धोका नाही. तसेच त्यांच्याकडून इतरांना कोरोन संसर्ग होण्याचा धोका खूप कमी आहे, पण यावर अजून संशोधन आवश्यक आहे.
वरील सर्व निर्देश हे जागतिक आरोग्य संघटनेने दिले असले तरी पाश्चिमात्य देशांमध्ये तसेच भारतातील काही नवजात शिशूतज्ज्ञांच्या मते आई कोरोनाबाधित असल्यास स्तनपानाचा निर्णय हा पालकांशी चर्चा करून मिळून घेतला जावा. अशा प्रकारे सर्व जोखीम सांगून पालक व डॉक्टरांनी चर्चा करून एकत्रित निर्णय घेतला जावा, असे पाश्चिमात्य देशातील वैद्यकीय जर्नल सांगतात.