CoronaVirus : महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी, मुंबईत 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 11:24 AM2020-03-17T11:24:05+5:302020-03-17T13:17:15+5:30
हिंदुजा रुग्णालयात दाखल असलेला 64 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.
मुंबईः कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईत 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या 64 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. हिंदुजामधील या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याला कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले होते, या रुग्णाला उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या अन्य समस्याही होत्या. देशातील हा कोरोनाबाधित रुग्णाचा हा तिसरा बळी आहे. तसेच महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाची लागण होऊन दगावलेला हा पहिला रुग्ण आहे. या व्यक्तीला 8 मार्चला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तो रुग्ण पेशानं एक व्यावसायिक होता. दुबईचा प्रवास करून तो मुंबईत आला होता. त्यानंतरच्या पुढील उपचारांसाठी त्याला कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर कस्तुरबा रुग्णालयातच त्याचा मृत्यू झाला आहे.
राज्यात सध्या कोरोनाचे 39 रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण पिंपरी चिंचवड आणि पुणे भागात आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये 9 जणांना कोरोनाची बाधा झाली असून पुण्यातल्या 7 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. राजधानी मुंबईत 6, तर उपराजधानी नागपुरात 4 रुग्ण आढळून आलेत. याशिवाय यवतमाळ, कल्याणमध्ये कोरोनाचे प्रत्येकी 3, नवी मुंबईत 2, तर रायगड, ठाणे, अहमदनगर, औरंगाबादमध्ये कोरोनाचा प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. त्यामुळे राज्यातल्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना 31 मार्चपर्यंत सुट्टी देण्यात आलीय. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून करण्यात आलंय.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश
कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. परिस्थिती आटोक्यात असली तरी गर्दी थांबवण्यासाठी काटेकोर प्रयत्न करावेच लागतील. या दृष्टीने सर्वधर्मीयांच्या प्रार्थनास्थळांवर नियमित पूजाअर्चा सुरु ठेवून भाविकांची गर्दी थांबवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. साथीचे रोग प्रतिबंध कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांची असून रोगाचे हे संकट टळल्यानंतर धार्मिक सण, उत्सव पूर्ववत साजरे करता येतील. या क्षणी जनतेच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. कोणत्याही पक्ष, संघटनांचे राजकीय कार्यक्रम, समारंभ, मेळावे रोगाचा प्रादुर्भाव असल्यामुळे होऊच नयेत, अशा सूचनादेखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.