Coronavirus: राज्यात आतापर्यंत कोरोनाचे १ लाख ५९ हजार रुग्ण; दिवसभरात ५,३१८ रुग्णांची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 03:16 AM2020-06-28T03:16:03+5:302020-06-28T08:22:12+5:30
मुंबईत दिवसभरात १ हजार ४०२ रुग्णांचे निदान झाले, तर ४१ मृत्यू झाले. त्यामुळे रुग्णसंख्या ७४ हजार २५२ झाली असून मृत्यू ४ हजार २८४ झाले आहेत.
मुंबई : राज्यात शनिवारी ५ हजार ३१८ रुग्णांची नोंद झाली असून १६७ मृत्यू झाले. त्यामुळे राज्याची रुग्णसंख्या १ लाख ५९ हजार १३३ झाली आहे. तर मृत्यू ७ हजार २७२ झाले आहेत. मागील काही दिवसांत राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून हे प्रमाण आता ५२.९४ टक्क्यांवर पोहोचले आहे, तर मृत्यूदर ४.५७ टक्के आहे.
राज्यात ६७ हजार ६०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शनिवारी नोंद झालेल्या १६७ मृत्यूंपैकी ८६ मृत्यू मागील ४८ तासांत झाले आहेत. उर्वरित ८१ मृत्यू मागील काळातील आहेत. या मृत्यूंमध्ये मुंबईतील ६४, जळगाव ५, धुळे ४, अहमदनगर २, नाशिक २, वसई विरार १, पिंपरी-चिंचवड १, जालना १ आणि लातूर १ यांचा समावेश आहे.
अन्य राज्य किंवा देशातील ७२ रुग्ण
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने १ लाख ५९ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यात अन्य राज्य वा देशातील ७२ कोरोना रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत २३ बाहेरील रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तर ४९ सक्रिय रुग्ण आहेत.
८४,२४५ जण झाले बरे
दिवसभरात ४,४३० रुग्ण बरे झाले असून राज्यात आतापर्यंत ८४,२४५ जण कोविडमुक्त झाले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ६५ हजार १६१ जण होम क्वारंटाईन आहेत, तर ३६ हजार ९२५ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत कोरोनामुळे आणखी ४१ बळी
मुंबईत दिवसभरात १ हजार ४०२ रुग्णांचे निदान झाले, तर ४१ मृत्यू झाले. त्यामुळे रुग्णसंख्या ७४ हजार २५२ झाली असून मृत्यू ४ हजार २८४ झाले आहेत. सध्या मुंबईत २७ हजार ६३१ सक्रिय रुग्ण आहेत, तर आतापर्यंत ४२ हजार ३२९ रुग्ण बरे झाले आहेत. शनिवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख ९६ हजार ८७४ नमुन्यांपैकी १७.७४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.