CoronaVirus: आजपासून १० कारागृहे लॉकडाऊन- अनिल देशमुख
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 03:58 AM2020-04-20T03:58:04+5:302020-04-20T03:58:31+5:30
औरंगाबाद शहरात संचारबंदी कडक करण्याचा विचार
औरंगाबाद : कारागृहांमध्ये कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा जास्त आहे. हर्सूल मध्यवर्ती कारागृहासह राज्यातील १० कारागृहे आजपासून ‘लॉकडाऊन’ करण्यात येत आहेत, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी येथे सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी देशमुख शनिवारी रात्री औरंगाबादेत दाखल झाले होते. रविवारी सकाळी त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत माहिती जाणून घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, कारागृहांमध्ये कैदी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी आजपासून प्रमुख १० कारागृहांमध्ये लॉकडाऊन केले जाणार आहे. लॉकडाऊन उठेपर्यंत आत असलेले कैदी, पोलीस कर्मचारी आतच राहतील. कारागृहाचे काम तीन पाळ्यांमध्ये चालते. आजपासून रात्रपाळीला गेलेले पोलीस बाहेर येणार नाहीत. त्यांची सर्व व्यवस्था आतच केली जाईल. औरंगाबादला संचारबंदी अधिक कडक करण्याचा विचार सुरू आहे. तीव्रतेनुसार ३ झोनमध्ये शहर विभागणी केली आहे.
येणाºया नवीन कैद्यांचे काय?
कारागृहे लॉकडाऊन केल्यानंतर नवीन येणाºया कैद्यांची कुठे व्यवस्था करणार, या प्रश्नावर हर्सूल मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव म्हणाले की, हर्सूल मध्यवर्ती कारागृहाबाहेर एक स्वतंत्र बरॅक तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये नव्याने दाखल कैद्यांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. कारागृहात अगोदरपासून असलेल्या कैद्यांसोबत नवीन कैद्यांचा संपर्क टाळण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.