Coronavirus: एसटीने आलेले १० प्रवासी पॉझिटिव्ह; २६२ प्रवाशांची तपासणी, काहींचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 02:26 AM2020-08-23T02:26:39+5:302020-08-23T07:35:38+5:30
शहरात आतापर्यंत रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची मनपाकडून अँटिजन टेस्ट करण्यात येत होती. आता एसटीने येणाऱ्या प्रवाशांचीही तपासणी सुरू केली.
औरंगाबाद : एसटीने औरंगाबादेत दाखल झालेल्या २६१ प्रवाशांची शनिवारी मध्यवर्ती बसस्थानकात अँटिजन टेस्ट करण्यात आली. यात १० प्रवासी पॉझिटिव्ह आढळून आले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या १५१ दिवसांपासून ठप्प असलेली एसटी महामंडळाची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक २० ऑगस्टपासून सुरू झाली. एसटीने आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास, वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. त्यामुळे बससेवेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे.
शहरात आतापर्यंत रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची मनपाकडून अँटिजन टेस्ट करण्यात येत होती. आता एसटीने येणाऱ्या प्रवाशांचीही तपासणी सुरू केली. मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांना रांगेत उभे करून मनपाच्या पथकाकडून ही तपासणी केली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत २६१ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यात १० प्रवासी पॉझिटिव्ह आढळले. त्यांना कोविड सेंटरमध्ये दाखल केल्याचे आगार व्यवस्थापक शिंदे यांनी सांगितले.
तपासणीला काहींचा विरोध
एसटीने आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास, वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. दोन दिवस मध्यवर्ती बसस्थानकात एकाही प्रवाशाची तपासणी झाली नाही; परंतु शनिवारी कोरोनाची तपासणी सुरू करण्यात आली. या तपासणीला काही प्रवाशांनी विरोध दर्शविला. बहुतांश प्रवाशांनी स्वत:हून तपासणी करून घेतली, असे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.