CoronaVirus: विदर्भात रुग्णासंख्या १२० वर, आतापर्यंत चार मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 03:37 AM2020-04-19T03:37:24+5:302020-04-19T03:38:28+5:30
नियंत्रणाचे प्रशासनासमोर आव्हान; शनिवारी दिवसभरात नागपूर चार तर अमरावतीत एक पॉझिटिव्ह
नागपूर : नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्या तुलनेत विदर्भाच्या इतर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या कमी झाली आहे. शनिवारी नागपुरात चार तर अमरावतीत आणखी एक रुग्णाचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. या रुग्णासह विदर्भात रुग्णांची संख्या १२० वर पोहचली आहे. यातील २३ रुग्ण बरे झाले आहेत तर चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नागपुरात या आठवड्यात ३६ रुग्णांचे निदान झाले आहे. रुग्णांमध्ये २० ते ५० वयोगटातील संख्या सर्वाधिक आहे. असेच चित्र विदर्भातील आहे. विशेष म्हणजे, नागपुरात कोरोनाचा पहिल्या मृत्यूनंतर रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मृताच्या व त्यांच्या नातेवाईकाच्या संपर्कात आलेले साधारण २५वर रुग्णांची नोंद झाली आहे. नागपुरात शनिवारी आढळून आलेल्या चार रुग्णांपैकी तीन रुग्ण याच मृताच्या वसाहतीतील आहेत. यातील एक २५ वर्षीय महिला आहे. चारही रुग्ण आमदार निवासाच्या अलगीकरण कक्षात १६ एप्रिलपासून दाखल होते. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत शुक्रवारी तपासलेल्या १३७ नमुन्यात अमरावती जिल्ह्यातील एक नमुना पॉझिटिव्ह आला. १२३ नमुने निगेटिव्ह आले. उर्वरीत १३ नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले. अमरावती जिल्ह्यातील एकूण बधितांची संख्या आता सहा झाली आहे.
आम्ही तुमची काळजी घेऊ
संचारबंदी शिथिल असण्याच्या काळात घराबाहेर पडलेल्या या जोडप्याच्या पुढ्यातील चिमुकलीला पोलिसांनी मास्क बांधून दिले. शनिवारी अमरावतीत सहाव्या कोरोनाबाधिताची नोंद झाली. अकारण बाहेर पडू नका, असे आवाहन पोलीस करत आहेत.
नागपुरात सर्वाधिक रुग्ण
विदर्भात सर्वाधिक रुग्ण नागपुरात आहेत. यांची संख्या ६३ असून एक मृत्यू व १२ रुग्ण बरे झाले आहेत. बुलडाणा जिल्ह्यात २१ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील एकाचा मृत्यू तर तीन बरे झाले आहेत.
अकोला जिल्ह्यात १५ रुग्ण असून एकाने आत्महत्या केली तर एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद आहे. यवतमाळ जिल्ह्यात १३ रुग्णांची नोंद असून पैकी सात रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गोंदिया व वाशिम जिल्ह्यात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद आहे.