Coronavirus: कोरोना लढ्यात राज्याला हवेत १२ हजार कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 06:26 AM2021-04-19T06:26:28+5:302021-04-19T06:26:36+5:30
आरोग्य व्यवस्थेचे हाेईल बळकटीकरण. राज्यातील आरोग्य व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना महामारीचा समर्थपणे मुकाबला केला जाईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना संसर्गाचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्राला हजारो कोटींचा निधी उभारावा लागणार आहे. आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासोबतच वैद्यकीय औषधे, सामग्रीसाठी या वर्षी तब्बल १२ हजार कोटींचा निधी उभारावा लागणार आहे.
कोरोना महामारीचा मुकाबला करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि सार्वजनिक आरोग्य विभागासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदींसोबतच एकूण १२ हजार कोटींच्या निधीची आवश्यकता भासणार आहे. यातून औषधे आवश्यक सामग्रीसोबतच आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीसाठी हा निधी लागेल. मागच्या वर्षी महामारीला रोखण्यासाठी सहा हजार कोटींचा निधी खर्च केल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असीम गुप्ता यांनी सांगितले.
राज्यातील आरोग्य व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोना महामारीचा समर्थपणे मुकाबला केला जाईल. राज्य आपत्ती निवारण निधीतून २१०० कोटींचा निधी प्रस्तावित आहे. तर, मुख्यमंत्री सहायता निधीतून २३६ कोटी आहेत. जिल्हा विकास निधीतून ३,३०० कोटींसोबतच विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होईल.
अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ३३६ कोटींचा निधी वापरण्याची घोषणा केली होती. प्रत्येक आमदाराने आपल्या निधीतून एक कोटी दिल्यास ३३६ कोटीचा निधी उभारला जाईल. हा निधी त्या त्या मतदारसंघातील आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी वापरला जाईल.
आमदार निधीचा विचार
प्रत्येक आमदाराने आपल्या निधीतून एक कोटी दिल्यास ३३६ कोटीचा निधी उभारला जाईल. अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ३३६ कोटींचा निधी वापरण्याची घोषणा केली होती.