coronavirus: राज्यात कोरोनाचे १२७८ नवीन रुग्ण; वर्धा जिल्ह्यातही कोरोनाचा शिरकाव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 06:24 AM2020-05-11T06:24:48+5:302020-05-11T06:25:21+5:30
आतापर्यंत कोरोनामुक्त राहिलेल्या वर्धा जिल्ह्यात रविवारी कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली. त्यामुळे गडचिरोली वगळता आता राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
मुंबई : राज्यात रविवारी १२७८ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे राज्यातील रुग्णांची संख्या २२ हजार १७३ झाली असून आतापर्यंत ५३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. समाधानाची बाब म्हणजे, ४ हजार १९९ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.
आतापर्यंत कोरोनामुक्त राहिलेल्या वर्धा जिल्ह्यात रविवारी कोरोनाच्या पहिल्या रुग्णाची नोंद झाली. त्यामुळे गडचिरोली वगळता आता राज्यातील
सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तर, मागच्या तीस दिवसांत गोंदियात एकही नवा रूग्ण आढळलेला नाही. भंडारा आणि गोंदियातील एकमेव रूग्णांचे अहवालही निगेटिव्ह आल्याने सध्या दोन्ही जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण नाही. तर, वाशिम आणि बीडमध्येही आतापर्यंत एक एकच कोरोना बाधिताची नोंद आहे.
वर्ध्यात आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील एक ३५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह ठरली. या महिलेला शासकीय रुग्णालयात भरतीसाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. विनोबा भावे सावंगी रुग्णालयात आणण्यात आले. तिथे ८ तारखेला त्यांचा स्त्राव घेण्यात आला होता. त्याचा अहवाल आज पॉझीटिव्ह आला. या घटनेनंतर हिवरा तांडा गाव आणि आवीर्तील खासगी रुग्णालय सील करण्यात आले. तर, गोंदिया जिल्ह्यात २६ मार्चला एक रुग्ण कोरोना बाधित आढळून आला. त्या रुग्णावर उपचार करून त्याच्या घशातील स्त्रावाचा चाचणी अहवाल १० एप्रिल रोजी नकारात्मक आल्यामुळे तो बरा झाल्याने त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
आदिवासी, ग्रामीण भागातील कोरोनाचा फैलाव आटोक्यात आल्याचे दिसत असतानाच महानगरांची स्थिती मात्र अद्याप गंभीरच आहे. एकट्या मुंबईत रविवारी कोरोनामुळे १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजची बाधित रूग्णांची संख्या ८७५ आहे. तर, एकूण ६२५ संशयित रुग्णांची भरती झाली आहे.
राज्यात रविवारी दिवसभरात १२७८ नवीन रूग्णांची नोंद झाल्याने कोरोना बाधितांचा आकडा २२ हजार १७३ इतका झाला आहे. तर, दिवसभरात ३९९ रुग्ण बरे झाले असून राज्यात आतापर्यंत तब्बल ४१९९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
तर, दिवसभरात राज्यात ५३ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. यात ३३ पुरुष आणि २० महिलांचा समावेश आहे. या ५३ मृत्यूपैकी तब्बल १९ जणांचे वय साठ वर्षांहून अधिक होते. तर ३०जण चाळीस ते साठ या वयोगटातील होते. तर, चारजण ४० वर्षांखालील आहेत. आज दिवसभरातील कोरोना मृतांपैकी १७ जणांच्या इतर आजार व वैद्यकीय पार्श्वभूमी अद्याप स्पष्ट झाली नाही. मिळालेली उर्वरित ३६ रुग्णांपैकी २७ जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ८३२ इतकी झाली आहे. आजच्या ५३ मृत्यूपैकी सर्वाधिक १९ मुंबई, पुणे शहरातील ५ , जळगाव शहरात ५, धुळ्यात ३, पिंपरी चिंचवड, अहमदनगर,औरंगाबाद, नंदुरबार, सोलापूर आणि वसई- विरारमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. आतापर्यंत प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या २ लाख ३८ हजार ७६६ नमुन्यांपैकी २ लाख १५ हजार ९०३ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर २२ हजार १७१ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १२३७ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १२,७६८ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५५.६१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
पुण्यातील १९४ जण कोरोनामुक्त
पुणे : कोरोनाबाधितांची संख्या पुणे शहरात दिवसेंदिवस वाढत असतानाच, दुसरीकडे सुखद चित्र पाहण्यास मिळत असून, रविवारी तब्बल १९४ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत़ मात्र बाधितांची संख्याही १०२ ने वाढली. यामुळे शहरातील बाधितांची संख्या आता २ हजार ४८२ झाली आहे़ यापैकी अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही १ हजार ३१८ इतकी आहे़
दक्षिण आफ्रिकेत ६० हजार रुग्ण
पॅरिस : जगभरात कोरोना रोगाने आतापर्यंत २ लाख ८2 हजार लोकांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या ४१ लाखांवर पोहोचली आहे. काही देशांनी लॉकडाउन शिथिल करणे सुरू केले असताना दक्षिण आफ्रिकेत नवीन ९,४०० रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या ६० हजारांवर गेली आहे. अमेरिकेत रुग्णांची संख्या १३ लाखांवर गेली असून मृतांचा आकडा ८० हजारांवर पोहोचला आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत २६ हजारांहून अधिक लोकांचा बळी गेला असून येथे एकूण रुग्णांची संख्या २ लाख ६४ हजार झाली आहे.
१० राज्यांत नवा रुग्ण नाही
24 तासांत १० राज्ये वा केंद्रशासित प्रदेशात एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र एकूण रुग्णांची संख्या वाढून ६७ हजार १६१ झाली आहे. त्यापैकी २० हजार ९६९ जण बरे झाले आहेत आणि मृतांचा आकडा २२१२ झाला आहे.