CoronaVirus News: सहा जिल्ह्यांत १३% लोकांना कोरोना; उपचाराविना झाले बरे!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2020 02:59 AM2020-10-07T02:59:26+5:302020-10-07T06:46:22+5:30
CoronaVirus News: आयसीएमआरचा सेरो सर्व्हे; बीड, परभणी, नांदेड, सांगली, अहमदनगर, जळगावचे सॅम्पल
- सोमनाथ खताळ
बीड : राज्यातील सहा जिल्ह्यांतील तब्बल १३ टक्के लोकांना गेल्या सहा महिन्यांत कोरोनाची लागण झाली आणि कुठलाही उपचार न करता ते बरेही झाले. यात सर्वाधिक २५.९ टक्के रुग्ण जळगाव जिल्ह्यातील असून सर्वात कमी ७.४ टक्के बीड जिल्ह्यातील आहेत.
बीड, परभणी, नांदेड, अहमदनगर, जळगाव व सांगली या सहा जिल्ह्यांत ‘आयसीएमआर’ने (इंडियन कौन्सील ऑफ मेडिकल रिसर्च) २४ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान ‘सेरो सर्व्हे’ करून २६८१ लोकांचे सॅम्पल घेतले होते. यात ३४८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून याचा टक्का १३.१२ एवढा आहे.
देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांच्या शरीरातील अँटिबॉडीज किती प्रमाणात तयार झाल्या आहेत, याची माहिती घेण्यासाठी मे महिन्यात भारतीय आयुर्विज्ञान संसाधन परिषदेने याच सहा जिल्ह्यांत पहिला सेरो सर्व्हे केला होता. यात १५९३ लोकांच्या रॅपिड टेस्ट केल्या असता २७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आॅगस्ट महिन्यात दुसरा सर्व्हे करण्यात आला. ६० गावांमधील तब्बल २,६८१ लोकांचे सॅम्पल घेतले होते. यात ३४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आयसीएमआरचे बलराम भारगवा यांनी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांना याचा अहवालही दिला आहे.
मास्क, सोशल डिस्टन्सिंग गरजेचे
बीडसह राज्यातील सहा जिल्ह्यांत आयसीएमआरकडून सेरो सर्व्हे करण्यात आला होता. बीड जिल्ह्यातही झाला होता. समजलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाबाबत आणखी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याची गरज आहे. मला काही होत नाही, हा गैरसमज मनातून काढावा. काळजी करू नका, पण काळजी घ्या.
- डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड
एक नजर आकडेवारीवर
जिल्हा सॅम्पल पॉझिटिव्ह टक्का
बीड ४४३ ३३ ७.४
परभणी ४८० ७३ १५.२
नांदेड ४३९ ४३ ९.८
सांगली ४६७ ५५ ११.७
अहमदनगर ४४७ ३९ ८.७२
जळगाव ४०५ १०५ २५.९
एकूण २६८१ ३४८ १३.१२