CoronaVirus: राज्यातील रुग्णांच्या संख्येत दिवसभरात १४५नं वाढ; कोरोनाग्रस्तांचा आकडा ६०० पार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 09:49 PM2020-04-04T21:49:36+5:302020-04-04T22:02:49+5:30
Coronavirus: राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ३२ जणांचा मृत्यू
मुंबई: राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्यानं वाढ होते आहे. आज दिवसभरात राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा तब्बल १४५ नं वाढला. सध्या राज्यात कोरोनाचे ६३५ रुग्ण असून यापैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. राजधानीत कोरोनाचे ३७७ रुग्ण असून त्याखालोखाल सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत. कोरोनामुळे मृत पावलेल्यांचा आकडा ३२ वर गेला आहे.
मुंबईत कोरोनाचे तब्बल ३७७ रुग्ण आहेत. राज्यातील एकूण रुग्ण संख्येचा विचार केल्यास त्यातील ६० टक्के रुग्ण मुंबईत आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे ३२ जणांचा मृत्यू झाला असून त्यातील २२ जणांचा मृत्यू मुंबईत झाला आहे. पुणे शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाचे ८२ रुग्ण असून मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा आणि जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे ७७ रुग्ण आहेत.
राज्यात शनिवारी एकूण ७०८ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. तर आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ हजार ५०४ नमुन्यांपैकी १३,७१७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ५२ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. सध्या राज्यात ४२ हजार ७१३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात अशून २ हजार १९३ संस्थात्मक अलगीकरण प्रक्रियेत आहेत.
दिल्लीत सहभागींपैकी ७३८ जणांना विलगीकरण कक्षात
दिल्ली येथे पार पडलेल्या धार्मिक संमेलनातील १२२५ या राज्यातील नागरिकांपैकी १०३३ व्यक्तींशी संपर्क झाला असून त्यापैकी ७३८ जणांना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. दिल्लीत सहभागींपैकी सात जण कोरोना बाधित आढळले आङेत. त्यात प्रत्येकी दोन पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर, व एक जण हिंगोलीतील आहे.
बळींची संख्या ३२ वर
केईएममध्ये शनिवारी पाच मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यात मुंब्रा येथील ५७ वर्षीय पुरुषांचा शनिवारी केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. या रुग्णास मधुमेह व उच्चरक्तदाबाचा आजार होता. निवृत्त बेस्ट वाहनचालक असणाऱ्या ६७ वर्षीय पुरुषाचा शुक्रवारी सकाळी मृत्यू झाला, त्याला १० वर्षांपासून मधुमेह होता. केईएममध्ये ५३ वर्षीय पुरुषाचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला, निवृत्त मिल कामगार असणाऱ्या रुग्णाला परदेशी प्रवासाचा इतिहास नव्हता. याखेरीज, शुक्रवारीच ७० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला त्याने परदेशी प्रवास केला नव्हता. नायर रुग्णालयात शुक्रवारी सायंकाळी ४६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तिला फुफ्फुसाचा तसेच हृदयविकाराचा त्रास होता. मधुमेह असणाऱ्या या महिलेला हायपोथयारॅडिझम हा आजारही होता. अमरावती येथे जिल्हा रुग्णालयात ४७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्या व्यक्तीस दम्याचा त्रास होता, त्यालाही परदेशी प्रवासाचा इतिहास नव्हता.
राज्यात कुठे किती रुग्ण-
मुंबई- ३७७
पुणे (शहर आणि ग्रामीण)- ८२
सांगली- २५
मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा आणि जिल्हे- ७७
नागपूर, अहमदनगर- प्रत्येकी १७
लातूर- ८
बुलढाणा- ५
यवतमाळ- ४
सातारा, औरंगाबाद, उस्मानाबाद- प्रत्येकी ३
कोल्हापूर, रत्नागिरी, जळगाव- प्रत्येकी २
सिंधुदुर्ग, गोंदिया, नाशिक, वाशिम, अमरावती, हिंगोली- प्रत्येकी १