Coronavirus: राज्यात १,९५३ डॉक्टरांना कोरोनाची लागण; २६४ डॉक्टरांनी गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 01:02 AM2020-08-24T01:02:41+5:302020-08-24T07:07:41+5:30
राज्यात ३५ जिल्हे आणि २७ महापालिका क्षेत्र आहेत. डॉक्टर फ्रंटलाइन योद्धा आहेत. कोरोना झालेले डॉक्टर हे सरकारी-पालिका आणि खासगी या सर्वच क्षेत्रांतील असून, मुंबई, पुणे, अकोला, कोल्हापूर आणि नाशिकमधील आहेत.
मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच कोरोना योद्धेही मोठ्या संख्येने कोरोनाचे शिकार होताना दिसत आहेत. २१ ऑगस्टपर्यंत राज्यात १ हजार ९५३ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. यात आयएमएच्या २६४ डॉक्टरांचा मृत्यू झाला असून, यातील १७ डॉक्टर राज्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यात ३५ जिल्हे आणि २७ महापालिका क्षेत्र आहेत. डॉक्टर फ्रंटलाइन योद्धा आहेत. कोरोना झालेले डॉक्टर हे सरकारी-पालिका आणि खासगी या सर्वच क्षेत्रांतील असून, मुंबई, पुणे, अकोला, कोल्हापूर आणि नाशिकमधील आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) आकडेवारीनुसार, १,७०० शाखा असून, या सर्व शाखांतील मिळून २६४ आयएमए डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. २१ ऑगस्टपर्यंत १,९५३ डॉक्टर कोरोनाग्रस्त झाले आहेत. यातील ८९० डॉक्टर स्वतंत्र प्रॅक्टिस करणारे, ७६७ डॉक्टर निवासी, तर २९६ डॉक्टर हाउस सर्जन आहेत.
डॉक्टरांचा कोरोनाग्रस्त रुग्णांशी थेट संपर्क येतो, त्यामुळे संसर्गाचा धोका अधिक असतो. दरम्यान, डॉक्टरांना कोरोनाची लागण होऊ नये वा त्यांचा मृत्यू होऊ नये, यासाठी सरकारकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.