Coronavirus : जानेवारीत राज्यात २ लाख रूग्ण; ८० लाख रुग्ण झाल्यास ८० हजार जणांचे मृत्यू होण्याची सरकारला भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 09:25 AM2022-01-01T09:25:23+5:302022-01-01T09:26:24+5:30

Coronavirus : राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्तांना डॉ. व्यास यांनी यासाठी दोन पत्रे तातडीने पाठविली आहेत. एका पत्रात त्यांनी कोरोनाची भयानकता विशद केली असून, दुसऱ्या पत्रात यासाठी कोणती पावले उचलायची आहेत याची विस्तृत माहिती दिली आहे.

Coronavirus: 2 lakh patients in the state in January; The government fears that 80,000 people will die if 80 lakh patients fall | Coronavirus : जानेवारीत राज्यात २ लाख रूग्ण; ८० लाख रुग्ण झाल्यास ८० हजार जणांचे मृत्यू होण्याची सरकारला भीती

Coronavirus : जानेवारीत राज्यात २ लाख रूग्ण; ८० लाख रुग्ण झाल्यास ८० हजार जणांचे मृत्यू होण्याची सरकारला भीती

googlenewsNext

मुंबई : कोरोना आणि ओमायक्रॉनच्या रुग्ण वाढीचा वेग पाहता जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यातली रुग्ण संख्या २ लाखांच्या घरात जाईल. या गतीने राज्यातील रुग्णसंख्या जर ८० लाखांच्या घरात गेली तर होणारे मृत्यू ८० हजारांच्या घरात जातील, अशी धक्कादायक माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे.

व्हायरस जरी सौम्य असला तरी त्याच्या संसर्गाचा वेग भयंकर आहे. त्यामुळे तो अधिक लोकांना बाधित करेल. बाधितांची संख्या लाखाच्या घरात जाईल व होणाऱ्या मृत्यूची टक्केवारी कमी दिसली तरी तो आकडा मोठा असेल. या सूत्रानुसार अंदाजे ८० हजार मृत्यू होतील. तातडीने गर्दी करणे टाळले, खबरदारीचे उपाय केले तर बाधितांच्या संख्येत घट होईल व मृत्यूदेखील कमी होतील. पण, बेफिकिरी दाखवली तर ८० हजारांच्या घरात मृत्यू १५ दिवसांतही होऊ शकतात, अशी भीतीही पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्तांना डॉ. व्यास यांनी यासाठी दोन पत्रे तातडीने पाठविली आहेत. एका पत्रात त्यांनी कोरोनाची भयानकता विशद केली असून, दुसऱ्या पत्रात यासाठी कोणती पावले उचलायची आहेत याची विस्तृत माहिती दिली आहे. मुंबईत रुग्ण वाढीचा वेग प्रचंड आहे. त्या मानाने बेडची संख्या कितीही जास्त असली तरी वाढत्या रुग्णांना त्याचा किती उपयोग होईल, असा प्रश्न या पत्राने निर्माण झाला आहे.

लसीकरणाला पर्याय नाही
कोणत्याही चर्चांवर जाऊ नका. जर लसीकरण झाले नसेल आणि सहव्याधी (अन्य आजार/कोमॉरबिडिटी) असतील तर ही लाटदेखील तेवढीच घातक ठरेल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जास्तीतजास्त लसीकरण करून घ्या.

व्यवस्था उभारण्याच्या सरकार तातडीच्या सूचना
२२ डिसेंबरच्या आकडेवारीनुसार मुंबई वगळता राज्यातील एकही जिल्हा कोविडच्या तिसऱ्या लाटेसाठी पूर्णत: तयार नव्हता. १७ ठिकाणी किरकोळ दुरुस्त्या तर १६ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे सांगत अतिरिक्त मुख्य सचिवांनी अधिकाऱ्यांचे कान उपटले.
ऑक्सिजन बेड, आयसीयू बेड, व्हेंटिलेटर बेड आणि अपेक्षित रुग्णवाढ याबद्दल याआधीच तपशीलवार माहिती सर्व जिल्ह्यांत दिली आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने त्यांच्या सुविधा तातडीने तपासाव्या. गरज असेल तर नवीन व्यवस्था उभी करा. केंद्राच्या निर्देशानुसार ऑक्सिजनची प्राधान्याने व्यवस्था करा.

विनाकारण बेड अडवू देवू नका 
६०% रुग्णांना सौम्य लक्षणे असतील. त्यामुळे त्यांना थेट हॉस्पिटलमध्ये भरती करू नका. नाहीतर, ज्यांना बेडची खरोखरच गरज आहे त्यांना ते मिळू शकणार नाहीत.

राज्यात एका दिवसात ८,०६७
राज्यात दिवसभरात तब्बल आठ हजार ६७ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ॲक्टिव्ह रुग्ण २४ हजार ५०९ एवढे आहेत. एक हजार ७६६ रुग्ण बरे होऊन घरी परतले. 
- सध्या राज्यात एक लाख ७५ हजार ५९२ व्यक्ती होम क्वाॅरंटाइनमध्ये आहेत तर एक हजार ७९ व्यक्ती संस्थात्मक क्वाॅरंटाइन आहेत.
- राज्यात चार ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली आहे. वसई-विरार, नवी मुंबई, मीरा-भाईंदर आणि पनवेल येथील प्रत्येकी एक रुग्ण ओमायक्रॉनबाधित आढळला आहे. शुक्रवारपर्यंत राज्यात  एकूण ४५४ ओमायक्रॉन बाधितांची नोंद झाली.

अतिरिक्त मुख्य सचिवांच्या सूचना...

...तर बेड वाढवा
ज्या दिवशी एकूण बेडच्या ५० टक्के बेड वापरात येतील त्याच्या तिसºया दिवशी पासून बेडची क्षमता तातडीने वाढवा.

ऑक्सिजन तयार ठेवा
एमबीबीएस डॉक्टरांची संख्या पुरेशी आहे की नाही हे तपासा. मेडीकल गॅस पाईलाईन, किमान ३ दिवस पुरेल एवढे लिक्वीड ऑक्सिजन, मोबाईल एक्सरे मशिन यांची उपलब्धता ठेवा.

गरजूनांच बेड द्या
ज्यांना गरज आहे अशाच रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटीलेटर असणारे बेड मिळतील याची खात्री करा, गरज नसणाऱ्यांना असे बेड देऊन गरजूंची अडवणूक होईल असे करु नका.

लसीकरण नव्हते म्हणून 
कोरोना कुठलाही असो, लसीकरण झाले नसेल तर धोका अधिक आहे या निष्कर्षावर या तिसऱ्या लाटेतही शिक्कामोर्तब झाले आहे. याचे कारण अमेरिकेत लहान मुलांचे लसीकरण झाले नव्हते त्यामुळे त्यांचे हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचे प्रमाणही वाढले होते. मार्च ते मे २०२१ या काळात लसीकरण झाले नव्हते. त्यामुळे त्यावेळी आपल्याकडे तीव्रता होती. ही बाब लक्षात ठेवावी लागेल.

...तर लॉकडाऊनची स्थिती ओढवू शकते 
राज्य सरकारने काल कडक निर्बंध लागू केले असतानाच, कोरोनावर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर जानेवारी आणि एप्रिलमध्ये विस्फोटक परिस्थिती निर्माण होईल. नियम पाळले नाही तर लॉकडाऊनची स्थिती येऊ शकते. कोरोनाचा प्रसार वेगाने होत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्याचे काम लोकांचे आहे. मागील लॉकडाऊनमध्ये लोकल आणि शाळांवर काही निर्बंध लावले होते. यंदाही निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील.  
    - विजय वडेट्टीवार, 
    मदत व पुनर्वसन मंत्री 

Web Title: Coronavirus: 2 lakh patients in the state in January; The government fears that 80,000 people will die if 80 lakh patients fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.