Coronavirus: रशियात अडकले महाराष्ट्रातील २०३ विद्यार्थी; घरी परतण्याची व्यवस्था करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 02:29 AM2020-05-09T02:29:35+5:302020-05-09T07:18:55+5:30
कल्याणच्या बिर्ला कॉलेज परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्या शिरीन पठाण राहतात. त्यांचे पती हे बेस्टमध्ये चालक आहेत. त्यांची मुलगी सानिया ही रशियातील ओएसएच विद्यापीठात शिक्षण घेत आहे.
कल्याण : रशियातील ओएसएच स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये भारतातील चार हजार विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेत असून कोरोनामुळे तेथे अडकून पडले आहेत. त्यामधील २०३ विद्यार्थी हे महाराष्ट्रातील आहेत. या विद्यार्थ्याना महाराष्ट्रात परतायचे आहे. लॉकडाऊनमुळे ते शक्य नसल्याने त्यांनी सरकारकडे परतीची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.
कल्याणच्या बिर्ला कॉलेज परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्या शिरीन पठाण राहतात. त्यांचे पती हे बेस्टमध्ये चालक आहेत. त्यांची मुलगी सानिया ही रशियातील ओएसएच विद्यापीठात शिक्षण घेत आहे. तिने आईशी संपर्क साधून घरी येण्याची इच्छा व्यक्त केली. तिच्यासारखेच २०३ विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत. सरकारने विदेशातून आणण्यात येणाऱ्या नागरिकांच्या यादीत रशियातील या विद्यार्थ्याचा समावेश नाही. भारतीय दूतावासाकडील यादी अपडेट नाही. त्यामुळे हे विद्यार्थी कसे परतणार, असा सवाल सानिया यांनी केला. निर्वासन अर्जात फ्लाईट किंवा क्वारंटाइन एक्सप्रेस असे पर्याय आहेत. याचा खर्च विद्यार्थ्याना परवडणारा नाही. माजी नगरसेवक रवी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्यांना मायदेशी परत आणण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली.