CoronaVirus: जगाचा आकडा २५ लाखांवर; राज्यात एकूण ५,२१८ रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 06:07 AM2020-04-22T06:07:00+5:302020-04-22T06:48:49+5:30

५५२ नवे बाधित; १९ मृत्यूंची नोंद; एकूण बळी २५१ वर

CoronaVirus 25 lakh infected with covid 19 worldwide 5218 patients in Maharashtra | CoronaVirus: जगाचा आकडा २५ लाखांवर; राज्यात एकूण ५,२१८ रुग्ण

CoronaVirus: जगाचा आकडा २५ लाखांवर; राज्यात एकूण ५,२१८ रुग्ण

Next

मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. मंगळवारी ५५२ नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाल्याने रुग्णांची संख्या ५ हजार २१८ वर पोहोचलीे. तर १९ मृत्यूंची नोंद झाल्याने एकूण बळींचा आकडा २५१ झाला. त्याचप्रमाणे, मुंबईत ३५५ रुग्णांचे निदान झाले असून एकूण रुग्णसंख्या ३ हजार ४५१ झाली आहे. तर शहर-उपनगरात १२ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांचा आकडा १५१ वर पोहोचला आहे. मुंबई शहर-उपनगरात कोरोनाचे २ हजार ८८७ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत. जगातही कोरोनाचा प्रकोप वाढत असून रुग्णांचा आकडा २५ लाख ३६ हजारांवर गेला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने मुंबई-पुण्यात शिथिल केलेल्या लॉकडाउनमधील सवलती पुन्हा रद्द करत अधिक काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. १९ मृत्यूंमध्ये मुंबईतील १२, पुण्यातील तीन, ठाणे मनपामधील २, सांगलीतील १ आणि पिंपरी-चिंचवड येथील एक आहे. यात १० पुरुष तर ९ महिला आहेत. १९ मृत्यूंपैकी ६० वर्षे व त्यावरील ९ रुग्ण आहेत. ९ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे. १२ रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आदी आजार आढळले आहेत.

१५० जण कोरोनामुक्त
मंगळवारी १५० जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ७२२ बरे झाल्याने त्यांना घरी सोडले आहे. सध्या ९९ हजार ५६९ लोक होम क्वारंटाइन असून ७ हजार ८०८ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. ८३ हजार नमुन्यांपैकी ७७ हजार ६३८ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.

लातूर, उस्मानाबाद, हिंगोली, वाशिममध्ये एकही रुग्ण नाही
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील लातूर, उस्मानाबाद, हिंगोली आणि वाशिम या चार जिल्ह्यांमध्ये गेल्या १४ दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, याचा विशेष उल्लेख केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. ६१ जिल्ह्यांमध्ये कोरियाचे रुग्ण आढळलेले नाहीत.

६१ जिल्ह्यांत एकही नवा रुग्ण नाही
नवी दिल्ली : देशात आतापर्यंत ३,९७५ जण कोरोनातून बरे झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण १४ टक्के होते. ते आता ते १७.४८ पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी दिली. सोमवारी ७०५ जण बरे झालेत. सध्या देशात २०,०८० रुग्ण आहेत. एकूण ६४५ मृत्यू झाले आहेत.

Web Title: CoronaVirus 25 lakh infected with covid 19 worldwide 5218 patients in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.