coronavirus : राज्यात एकाच दिवसात सापडले कोरोनाचे 352 रुग्ण, एकूण आकडा 2334 वर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 10:30 PM2020-04-13T22:30:09+5:302020-04-13T23:16:19+5:30
राज्यात आज एका दिवसात कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे राज्यात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा आता 160 वर पोहोचला आहे.
मुंबई - कोरोनाच्या फैलावाचा वेग वाढल्याने राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. आज एकाच दिवसात राज्यात कोरोनाचे 352 रुग्ण सापडले असून, राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2334 वर पोहोचला आहे. तर आज एका दिवसात कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 160 झाली आहे.
राज्यात सापडलेल्या नव्या रुग्णांपैकी सर्वाधिक 242 रुग्ण केवळ मुंबईत सापडले आहेत. तर 39 रुग्ण पुण्यात सापडले आहेत. आज राज्यात 11 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे 9 आणि पिंपरी चिंचवड तसेच मीरा भाईंदर येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. मृत्यूमुखी पडलेल्या 11 जणांपैकी 8 रुग्णांमध्ये ( 73 %) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 160 झाली आहे. दरम्यान, सध्या राज्यात १९४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
कोरोनाचा संशय असलेल्या व्यक्तींच्या आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 43,199 नमुन्यांपैकी 39,089 जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर 2334 जण पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच आज राज्यातून 229 रुग्णांना ते कोरोनामधून बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
काल सोलापूरात पहिला करोना बाधित मृत्यू झाल्यानंतर तेथील आरोग्य यंत्रणा युध्दपातळीवर काम करत असून या रुग्णाच्या निवासी परिसरात ३५,००० लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यासाठी ६२ सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत. या बाधित रुग्णाच्या अतिजोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत असून आतापर्यंत ७९ निकट सहवासितांना विलग करण्यात आले आहे.
दरम्यान, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 9 हजार 352 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासात देशभरात कोरोनाचे नवे 905 रुग्ण सापडले आहेत. तर 51 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनामुळे आतापर्यंत 324 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 980 जण बरे झाले आहेत.