Coronavirus : ४० लाख कामगारांच्या रोजीरोटीवर संक्रांत; बांधकाम मजूर, घरेलू व माथाडी अजूनही वाऱ्यावरच
By यदू जोशी | Published: March 25, 2020 02:56 AM2020-03-25T02:56:19+5:302020-03-25T05:36:44+5:30
Coronavirus : बांधकाम मजुरांसाठी राज्य शासनाचे कल्याण मंडळ आहे. या मंडळाकडे साडेसहा हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बांधकाम मजूर ज्या ठिकाणी काम करतात तेथील मालकांकडून राज्य शासनाकडे जो सेस भरला जातो.
- यदु जोशी
मुंबई : राज्यातील १८ लाख बांधकाम मजूर १० लाख घरेलू कामगार, १० लाख फेरीवाले आणि दोन लाख माथाडी कामगार अशा सुमारे ४० लाख कामगारांच्या रोजीरोटीवर कोरोनामुळे संक्रांत आली आहे. हातावर पोट असलेल्या या कामगारांसाठी दिलासा देणारा एकही निर्णय राज्य शासनाने अद्याप घेतलेला नाही.
बांधकाम मजुरांसाठी राज्य शासनाचे कल्याण मंडळ आहे. या मंडळाकडे साडेसहा हजार कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. बांधकाम मजूर ज्या ठिकाणी काम करतात तेथील मालकांकडून राज्य शासनाकडे जो सेस भरला जातो. त्यातून हा निधी निर्माण झाला आहे. एका अर्थाने तो या मजुरांच्या हक्काचा निधी आहे. त्यातून त्यांना तत्काळ मदत करण्याची भूमिका राज्य शासनाने घेण्याची आवश्यकता आहे. मात्र, राज्याच्या कामगार विभागाने अद्याप त्याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही.
या बांधकाम मजुरांना मुंबई ठाणे पुणे नागपूर अशा निवडक शहरांमध्ये कामाच्या ठिकाणी पाच रुपयात जेवणाची व्यवस्था अलीकडे सुरू करण्यात आली आहे. मात्र, आता बांधकामेच बंद असल्यामुळे त्यांना हे जेवणदेखील मिळत नाही. अशावेळी कल्याण निधीतून बांधकाम मजुरांच्या थेट बँक खात्यात पैसे जमा करावेत, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मुंबईमध्ये ५ लाख तर राज्यात १० लाख फेरीवाले आहेत. राज्यभरात जवळपास १० लाख घरेलू कामगार महिला आहेत. फेरीवाल्यांचा व्यवसाय आणि घरेलू कामगारांची कामे ठप्प झाली आहेत. दीड ते दोन लाख माथाडी कामगार आहेत. त्यांचाही रोजगार बुडाला आहे. याशिवाय असंघटित क्षेत्रात असलेले लाखो कामगार तूर्त रोजगाराला मुकले आहेत.
महाराष्ट्र राज्य घरकामगार समन्वय समितीच्या कार्याध्यक्ष शुभा शमीम यांनी अंगणवाडीमधील बालकांप्रमाणे घरेलू कामगारांच्या मुलामुलींनादेखील शासनाने घरपोच पोषण आहार पोचवावा, कुठल्याही घरमालकाने या कामगारांचे वेतन कापू नये तसेच बीपीएल कार्ड असलेल्या व नसलेल्या सर्व घरेलू कामगारांना रेशन दुकानातून मोफत २५ किलो धान्य वाटप करावे अशी मागणी केली.
माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे यांनी माथाडी बांधवांना पंधरा हजार रुपयाची मदत तत्काळ करावी अशी मागणी केली आहे. माथाडी बोडार्तून हा निधी देता येऊ शकेल असे त्यांनी लोकमतला सांगितले. बांधकाम मजूर मंडळाचे माजी सदस्य दादाराव डोंगरे यांनी या मजुरांना किमान पाच हजार रुपयांची एकरकमी मदत द्यावी, अशी मागणी केली.
मजुरांना कल्याण निधीतून तात्काळ मदत करावी
बीपीएल रेशन कार्डधारकांना मोफत धान्य देण्याचा निर्णयदेखील शासनाने अद्याप घेतलेला नाही. तो घेतला तर लाखो लोकांना दिलासा मिळेल. मात्र बीपीएल कार्डधारकांना दोन महिन्याचे आगाऊ रेशन देण्याचा तेवढा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे.
मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी असे मोफत धान्य दिले जाईल अशी घोषणा चार दिवसांपूर्वी केली होती. आज त्यांच्याशी संपर्क साधला असता एक-दोन दिवसात याबाबतचा निर्णय घेऊ असे ते म्हणाले. वडेट्टीवार पालकमंत्री असलेल्या चंद्रपूर जिल्ह्णात दहा किलो धान्य, तेल आदींचे वाटप उद्यापासून करण्यात येणार आहे.
बांधकाम मजुरांना कल्याण निधीतून तात्काळ मदत करावी असे आदेश केंद्रीय कामगार मंत्रालयाने विविध राज्यांना दिले आहेत; परंतु त्याची अंमलबजावणीदेखील राज्यात अद्याप झालेली नाही.