Coronavirus: महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांनी ठाकरे सरकारचं टेन्शन वाढवलं; लोकांना अधिक सतर्क राहण्याचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 06:25 PM2021-09-07T18:25:04+5:302021-09-07T18:25:22+5:30
केरळमध्ये ओनम सणानंतर कोरोना संक्रमितांच्या संख्येत बरीच वाढ झाल्याचं आढळून आलं.
मुंबई – गणेश चतुर्थीच्या निमित्ताने राज्यभरात उत्साहाचं वातावरण आहे. या स्थितीत कोरोनाचं विघ्न पडू नये यासाठी जनतेने खबरदारी घेणं गरजेचे आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या कोविड नियमांचे तंतोतंत पालन करावे. गर्दी करू नये. गर्दीमुळे कोरोना संक्रमण वाढण्याचा धोका आहे. अन्य राज्यांकडे बघून आपण उदाहरण घेतलं पाहिजं. त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावं असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
राजेश टोपे म्हणाले की, केरळमध्ये ओनम सणानंतर कोरोना संक्रमितांच्या संख्येत बरीच वाढ झाल्याचं आढळून आलं. सध्याच्या स्थितीत अन्य राज्यात संक्रमण कमी आहे परंतु केरळमध्ये भयंकर परिस्थिती आहे. केरळमध्ये यावेळी दर दिवसाला ३० हजाराच्या आसपास रुग्ण आढळत आहेत. अपवादात्मक म्हणजे ६ सप्टेंबरला १९ हजार रुग्ण सापडले. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यात कोरोना संक्रमण वाढत असल्याचं सांगितलं. यात मुंबई-पुण्याचाही सहभाग आहे.
The number of patients has increased in Kerala due to the crowds during the Onam festival. In Maharashtra, there are 4 to 5 districts including Pune where the number of COVID patients is high: Maharashtra Health Minister Rajesh Tope
— ANI (@ANI) September 7, 2021
राज्यातील ५ जिल्ह्यात संक्रमण वाढलं
मुंबई, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि अहमदनगर या जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या संख्येने सरकारची डोकेदुखी वाढली आहे. या जिल्ह्यात कोरोना संक्रमिक संख्या अधिक आहे. राज्यातील एकूण कोरोना संक्रमित संख्येपैकी ७० टक्के याच जिल्ह्यातील आहेत. या जिल्ह्यात राहणाऱ्या लोकांना अधिक सतर्क राहणं गरजेचे आहे. मुंबईच्या ज्या भागात सर्वात उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जातो त्या परिसरात संक्रमण अधिक होण्याची भीती आहे. लालबागच्या राजा गणेशोत्सव पाहण्यासाठी खूप लांबून लोकं येतात. परंतु मुंबईत लालबाग आणि परळ भागात कोरोना संक्रमण सध्या जास्त आहे अशी माहिती राजेश टोपेंनी दिली.
कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण?
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात १२ हजार ४१३, सातारा ६ हजार ३२८, मुंबई ४ हजार २७३, रत्नागिरी १०८१ आणि अहमदनगरमध्ये ४ हजार ९७५ रुग्ण आढळले आहेत. रत्नागिरीत सोमवारी १२५ रुग्ण आढळले तर ५ जणांचा मृत्यू झाला. तर ११८ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना संक्रमित होणाऱ्या रुग्णांची संख्या रत्नागिरी, चिपळूण तालुक्यात आहे. सातारा जिल्ह्यात सोमवारी ३०८ नवे कोरोना बाधित आढळले तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.