CoronaVirus : राज्यात कोरोनाचे ५२२ नवे रुग्ण, आतापर्यंत साडे आठ हजारांचा टप्पा ओलांडला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 09:53 PM2020-04-27T21:53:44+5:302020-04-27T21:54:13+5:30
CoronaVirus : राज्यात सोमवारी दिवसभरात झालेल्या २७ मृत्यूंपैकी १५ मुंबईतील, सहा अमरावतीमधील, पुण्यातील चार, जळगाव- औरंगाबाद येथे प्रत्येकी एका मृत्यूंची नोंद झाली आहे.
मुंबई : राज्यात एप्रिल अखेरीस कोरोना रुग्णांच्या संख्येने साडे आठ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात सोमवारी ५२२ कोरोना रुग्णांचे निदान झाले, तर एकूण रुग्णसंख्या ८५९० इतकी झाली. तर राज्यात २७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे राज्यात कोरोना (कोविड१९) ने झालेल्या मृत्यूंची संख्या ३६९ वर पोहोचली आहे.
मुंबईत सोमवारी ३९५ इतक्या कोरोना रुग्णांचे निदान झाले असून एकूण रुग्णसंख्या ५ हजार ७७६ वर पोहोचली आहे. तर सोमवारी १५ मृत्यूंची नोंद झाली असून बळींचा आकडा २१९ झाला आहे. राज्यात सोमवारी दिवसभरात ९४ रुग्णांना बरे होऊन घरी पाठवले, तर आजपर्यंत १२८२ रुग्ण कोरोना (कोविड१९) मुक्त झाले आहेत.
राज्यात सोमवारी दिवसभरात झालेल्या २७ मृत्यूंपैकी १५ मुंबईतील, सहा अमरावतीमधील, पुण्यातील चार, जळगाव- औरंगाबाद येथे प्रत्येकी एका मृत्यूंची नोंद झाली आहे. अमरावती शहरात झालेले मृत्यू २० ते २५ एप्रिल या कालावधीतील आहे. सध्या राज्यात १ लाख ४५ हजार ६७७ लोक घरगुती अलगीकऱण प्रक्रियेत असून ९ हजार ३९९ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आजपर्यंत १ लाख २१ हजार ५६२ नमुन्यांपैकी १ लाख १२ हजार ५२२ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत.