Coronavirus: चिंताजनक! मुंबईत ५७ नवे रुग्ण सापडले; राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४९०वर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 06:17 PM2020-04-06T18:17:02+5:302020-04-06T19:32:55+5:30
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४९०च्या वर गेला असून, ३४ जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई – मुंबईच्या मायानगरीत कोरोनाचा प्रादुर्भाव तासागणिक वाढतोय. परिणामी, कोरोनाच्या संसर्गाचा धोका वेळीच ओळखला नाही, तर परिस्थिती आणखी चिंताजनक होणार आहे. मागील २४ तासांत मुंबई शहर उपनगरात ५७ नव्या कोरोना (कोविड-१९) रुग्णांचे निदान झाले असून आता महानगरातील कोरोना बाधितांची संख्या ४९० वर जाऊन पोहोचली आहे. तर मुंबईत शनिवारी व रविवारी प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने शहर उपनगरातील मृतांचा आकडा ३४ वर पोहोचला आहे. सोमवारी पाच रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
कोरोनामुळे मृत झालेल्या चारही रुग्णांना दीर्घकालीन आजार होता. आतापर्यंत महापालिकेच्या चमूने १५ लाख नागरिकांचे सर्वेक्षण केले असून ६६५ सहवासितांची शोध घेऊन चाचणी कऱण्यात आली आहे. तसेच घरोघरी १४०० इतके नमुने पाच चमूंमार्फत एकत्रित कऱण्यात आले आहे. या शोध, तपासणी व उपचार अशा त्रिसुत्रींतून तब्बल १३० कोरोना (कोविड१९) रुग्ण सापडले आहेत. एकूण १०,९६८ सहवासितांचे अलगीकरण कऱण्यात आले आहे. त्यातील ३९९० सहवासितांनी ५ एप्रिलपर्यंत अलगीकरण काळ पूर्ण केला आहे. आजपर्यंत २२६ प्रतिबंधात्मक क्षेत्र शोधले आहेत आणि अद्ययावत करण्यात येत आहेत.57 new COVID-19 cases in Mumbai; tally 490 including 34 deaths: BMC
— Press Trust of India (@PTI_News) April 6, 2020
.................................................
कोविड क्लिनिकमधून ११२ नमुने
प्रतिबंधात्मक क्षेत्रामध्ये संशयित कोविड-१९ रुग्ण शोध घेण्यासाठी विशेष क्लिनिक सुरु करण्यात आले आहेत. त्यासाठी डॉक्टर, परिचारिका व प्रयोगशाळा तंत्रज्ञ नेमण्या आले आहेत. ५ एप्रिल रोजी १० क्लिनिक सुरु कऱण्यात आले. त्यामध्ये ४६० सहवासितांपैकी १२२ नमुने घेण्यात आले.
............................................
बळींची संख्या ३४ वर
परळ येथील ग्लोबल रुग्णालयात ८० वर्षीय पुरुषाला २९ मार्च रोजी दाखल कऱण्यात आले. त्यावेळेस, त्या रुग्णाला ताप, श्वसनास त्रास व उच्चरक्तदाब अशा समस्या होत्या. सर्व अवयव निकामी झाल्याने रविवारी सायंकाळी या रुग्णाचा मृत्यू ओढावला. ०३ एप्रिल रोजी खासगी प्रयोगशाळेद्वारे त्यास कोरोनाचे निदान झाले होते. जोगेश्वरी ट्रामा रुग्णालयातील ४१ वर्षीय पुरुष ०२ मार्च रोजी ताप असल्याने दाखल झाला, त्यास मद्यपानाची सवय होती. त्याचा रविवारी सायंकाळी श्वसनाच्या तीव्र समस्येने मृत्यू झाला. ०१ एप्रिल रोजी खासगी प्रयोगशाळेत त्या रुग्णास कोरोनाचे निदान झाले. याखेरीज, याच रुग्णालयात ६२ वर्षीय पुरुषाला ०१ एप्रिल रोजी ताप, बेशुद्धावस्थेत उपचारासाठी दाखल केले. या रुग्णाला पक्षाघात, उच्चरक्तदाब व एपिलॅप्सीचा त्रास होता या रुग्णाचा मृत्यू ०४ एप्रिल रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने झाला. ३१ मार्च रोजी खासगी प्रयोगशाळेत त्याचे कोरोनाचे निदान झाले होते. तर सेंट जाॅर्ज रुग्णालयात ५२ वर्षीय रुग्ण कफ व श्वसनाच्या त्रासामुळे दाखल झाला होता. त्याला मधुमेह होता. या रुग्णांचा ०४ एप्रिल रोजी सायंकाळी मृत्यू झाला, याच दिवशी त्याचा कोरोनाचा अहवाल पाॅझिटिव्ह असल्याचे निदान झाले.
......................................................
बाह्यरुग्ण विभागात तपासणी आलेले रुग्ण १९७
एकूण भरती झालेले संशयित रुग्ण १५०
एकूण पाॅझिटिव्ह रुग्ण ५७
घरी सोडलेले रुग्ण ०५
आतापर्यत बाह्यरुग्ण विभागात तपासणी आलेले रुग्ण ९८६१
एकूण भरती झालेले संशयित रुग्ण २८०६
एकूण मृत रुग्णांची संख्या ३४
आतापर्यंत घरी सोडलेले रुग्ण ५९