coronavirus: ‘राज्यभरात एकाच दिवशी ५८७ कोरोना रूग्णांना डिस्चार्ज’
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 07:48 AM2020-05-13T07:48:48+5:302020-05-13T07:50:29+5:30
एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणावर रूग्णांना डिस्चार्ज मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांमुळे हा एकप्रकारचा विक्रम असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
मुंबई : राज्यात सोमवारी एकाच दिवशी कोरोनाचे ५८७ रुग्ण बरे झाले. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणावर रूग्णांना डिस्चार्ज मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांमुळे हा एकप्रकारचा विक्रम असल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी ठाणे येथील २०९ रुग्णांना घरी सोडण्यात आले. पुणे येथील १६१ मुंबईतल ५५, रायगड येथील ५३ औरंगाबाद येथील ४३ अशा प्रकारे राज्यभरात ५८७ रुग्णांना घरी सोडण्यात आले. आज त्यात बरे होणाऱ्या ३०० हून अधिक रुग्णांची अजून भर पडल्याने राज्यभरात ५००० रुग्ण बरे झाले आहेत.
विशेष म्हणजे गेल्या आठवड्यात सोमवारी पहिल्यांदाच ३५० रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. आता एक आठवड्यानंतर पुन्हा एकदा विक्रमी संख्येत रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.
सोमवारी ११ मे रोजी मुंबई महापालिका क्षेत्रातील ५५, ठाणे २०९, रायगड ५३ असे मुंबई मंडळात एकूण ३२१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत एकूण ३१६० रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. पुणे १६१ तर सातारा येथील १४ असे पुणे मंडळात एकूण १७५ रुग्णांना घरी सोडले तर आतापर्यंत एकूण ११४६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. नाशिक मंडळात आतापर्यंत एकूण १३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. कोल्हापूर मंडळात आतापर्यंत एकूण ४२ रुग्णांना, औरंगाबाद मंडळात एकूण ११७, लातूर मंडळात एकूण १२, अकोला मंडळात एकूण १०१ तर नागपूर मंडळात आतापर्यंत एकूण ७४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
रुग्णांसाठी लॉकडाउनमध्ये मोफत आॅनलाइन ओपीडी
लॉकडाउनमुळे अनेक खासगी दवाखाने बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना आरोग्यविषयक तपासणी आणि सल्ला देण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेली ई- संजीवनी ओपीडी आता राज्यभर कार्यरत राहणार आहे. त्यासाठी ६६६.ी२ंल्ल्नीी५ंल्ल्रङ्मस्र.्रिल्ल या संकेतस्थळाला रुग्णांनी भेट देऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. यासाठी रुग्णांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.