CoronaVirus चिंताजनक! मुंबईत दिवसभरात 59, तर राज्यात एकूण ७७ रुग्ण वाढले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 06:49 PM2020-03-31T18:49:59+5:302020-03-31T19:41:03+5:30
राज्यात आरोग्य मंत्र्यांपासून ते आरोग्य सेवकापर्यंत सारेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काम करत आहेत.
मुंबई : राज्य आणि केंद्र सरकारने लॉकडाऊन करूनही राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमालीची वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत असून कोरोनाचे संकट आणखी गडद होत आहे.
राज्यात आरोग्य मंत्र्यांपासून ते आरोग्य सेवकापर्यंत सारेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काम करत आहेत. मात्र, तरीही आज दिवसभरात एकट्या मुंबईत ५९ कोरोनाग्रस्त सापडले आहेत. तर राज्यात आज सापडलेल्या रुग्णांचा एकूण आकडा ७७ झाला आहे.
काल राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा २३० होता. मात्र, आज यामध्ये कमालीची वाढ झाली असून तिनशेचा टप्पा पार केला आहे. आज राज्यात बुलढाण्याचे दोन रुग्ण पकडून हा आकडा ३०४ झाला आहे.
अहमदनगरमध्ये ३, मुंबईमध्ये ५९, पुण्यात २, ठाणे २, कल्याण २, नवी मुंबई २, वसई विरार २ असे ३०२ नवीन रुग्ण सापडले आहेत. रुग्णांचा वाढता आकडा राज्य सरकारचे टेन्शन वाढविणारा आहे. दिवसभरात रुग्णाचा मृत्यू झालेला नसला तरीही आज ७७ रुग्ण सापडले आहेत.
आतापर्यंत ३९ करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात २३,९१३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १४३४ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत. नवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.