CoronaVirus: राज्यात ६४ टक्के कोरोना रुग्ण लक्षणविरहित आढळल्याने चिंता
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 05:28 AM2020-04-24T05:28:09+5:302020-04-24T07:05:10+5:30
तरुणांची संख्या अधिक; पाच हजारांपेक्षा जास्त बाधित रुग्ण
- स्नेहा मोरे
मुंबई : राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसागणिक गंभीर होते आहे. त्यात कोरोनाच्या रुग्णांनी आता पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. आरोग्य यंत्रणा कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी रात्रंदिवस झटत असताना आता कोरोनाचे नवे आव्हान निर्माण झाले आहे. राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येपैकी ६४ टक्के कोरोना रुग्ण लक्षण विरहित असल्याचे समोर आले आहे. तर अवघ्या १२ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे लक्षणेविरहित रुग्ण हे कोविड कॅरिअर असू शकतात त्यांचा धोका जाणून यंत्रणांनी प्राथमिक लक्षणे असणाऱ्यांचीही तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.
कोरोना (कोविड-१९) विषाणूची बाधा झाल्यानंतर साधारण ५-६ दिवसांत ताप येतो. तसेच सर्दी खोकला ही लक्षणही दिसतात. जास्तीत जास्त १५ दिवसांच्या काळात ही लक्षणे दिसू शकतात. मात्र ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असते त्यांच्यात अशी लक्षणे ही दिसून येत नाही. राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून चाचणी केली असता कोणतीही लक्षणे दिसत नसतानाही कोरोनाची बाधा झाली असल्याचे उघड झाले. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अति जोखमीच्या प्रत्येक व्यक्तीची चाचणी करण्यात येत आहे. राज्यात दररोज सात हजार चाचण्या केल्या जात आहेत, अशी माहिती राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.
बाधित रुग्णाच्या सहवासितांसह संपर्कातील प्रत्येकाची तपासणी करण्यात येत आहे. त्यामुळे कोणतीही लक्षणे नसलेली रुग्णही आढळत आहेत. यामध्ये तरुण आणि मध्यवयीन रुग्ण अधिक असल्याचे दिसते. आतापर्यंत अनेक रुग्णांमध्ये कोविडची सर्वसाधारण लक्षणे दिसत नसल्याचे समोर आले आहे.
लक्षणे असलेले कोरोना रुग्ण 12%
लक्षणे विरहित कोरोना रुग्ण 64%
प्रकृती गंभीर असलेले कोरोना रुग्ण 1%
कोरोना (कोविड१९) मुक्त रुग्ण 17%
कोरोना रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण 6%
एकूण रुग्णसंख्येत पुरुषांचे प्रमाण 61%
एकूण रुग्णसंख्येत महिलांचे प्रमाण 39%
एकूण पुरुष रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण 64%
एकूण महिला रुग्णांच्या मृत्यूंचे प्रमाण 36%
भरती असलेले ८३ टक्के रुग्ण लक्षणेविरहीत
राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण संशोधन संचालनालयाच्या अहवालानुसार, राज्यात रुग्णालयात भरती असलेल्या एकूण रुग्णांपैकी ८३ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. रुग्णालयात उपचार घेत असणाºया केवळ १५ टक्के रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत, तर दोन टक्के रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.