Coronavirus: राज्यात ६६ प्लाझ्मा बॅग उपलब्ध; कोरोना विषाणूला हरविलेल्या दात्यांनी पुढे यावे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 03:31 AM2020-07-03T03:31:14+5:302020-07-03T03:31:30+5:30
गंभीर लक्षणे असलेल्या ५०० कोविडच्या रुग्णांवर ही चाचणी केली जाणार आहे. जगात एवढ्या मोठ्या संख्येत व केवळ गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांवर पहिल्यांदाच ही चाचणी होऊ घातली आहे.
नागपूर : ‘कोविड-१९’वर ‘प्लाझ्मा थेरपी’ने एक नवीन उमेद जागविली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’ (प्लाझ्मा थेरपी इन नोव्हेल कोरोनाव्हायरस असेसमेंट) या नावाने चाचणी उपचार प्रकल्प हाती घेतला आहे. कोरोना विषाणूला हरवून जी व्यक्ती बरी झाली आहे, ते प्लाझ्मा देण्यासाठी पुढे येत आहेत. आतापर्यंत ६६ प्लाझ्मा बॅग उपलब्ध झाल्या आहेत.
गंभीर लक्षणे असलेल्या ५०० कोविडच्या रुग्णांवर ही चाचणी केली जाणार आहे. जगात एवढ्या मोठ्या संख्येत व केवळ गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांवर पहिल्यांदाच ही चाचणी होऊ घातली आहे. याची जबाबदारी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाकडे (मेडिकल) सोपविण्यात आली आहे. या प्रकल्पात राज्यातील १७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये व मुंबईतील बीएमसी वैद्यकीय महाविद्यालयाची चार महाविद्यालये अशा एकूण २१ केंद्रांवर प्लाझ्मा थेरपी ट्रायल केली जाणार आहे. सर्व गंभीर रुग्णांना २०० मिलिलिटर कॉन्व्हॅलेसेंट प्लाझ्माचे २४ तासांच्या अंतरात दोन डोस दिले जाणार आहे.
कोरोना विषाणूला हरविलेल्या दात्यांनी पुढे यावे
सौम्य लक्षणे असताना ‘कोविड-१९’ आजारातून बरे झालेल्या व्यक्तींनी कोरोनाला हरविण्यासाठी पुढे यायला हवे. शासकीय रुग्णालयात जाऊन प्लाझ्मा दान करायला हवे. प्लाझ्मा दान केल्यावर अशक्तपणा येत नाही. विशेष म्हणजे, चार आठवड्यांनंतरही पुन्हा प्लाझ्मा दान करता येऊ शकते. -डॉ. एम. फैजल, प्रकल्प इन्चार्ज व स्टेट नोडल अधिकारी, ‘प्रोजेक्ट प्लॅटिना’