CoronaVirus: राज्यात २४ तासांत ७७८ नवे रुग्ण; एकूण बाधितांचा आकडा ६,४२७ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 05:45 AM2020-04-24T05:45:50+5:302020-04-24T05:46:09+5:30
बळी २८३ वर, मुंबईची रुग्णसंख्या ४ हजार २०५
मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती भीषण होतेय, लॉकडाउन असूनही राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढताना दिसतो आहे. राज्यात गुरुवारी दिवसभरात ७७८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, हे आतापर्यंतचे राज्यातील सर्वाधिक निदान आहे. त्यामुळे राज्यातील एकूण बाधितांची संख्या ६,४२७ झाली आहे. राज्य शासनासमोरचे कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे आव्हान अधिक कठीण होत आहे. राज्यात गुरुवारी १४ मृत्यूंची नोंद झाली असून बळींचा आकडा २८३वर पोहोचला आहे. मुंबईत गुरुवारी ४८७ इतके रुग्णाचे निदान झाले असून, रुग्णसंख्या ४ हजार २०५ झाली आहे. मुंबईत गुरुवारी सहा जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या १६७ झाली आहे.
राज्यात गुरुवारी सर्वाधिक कोरोना रुग्णांचे निदान झाले, यापूर्वीही १९ एप्रिल रोजी राज्यात एकाच दिवशी ५५२ कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. राज्यात गुरुवारी १४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, त्यात मुंबईतील सहा, पुणे येथील पाच, नवी मुंबई, नंदुरबार आणि धुळे मनपा येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. १४ मृत्यूंपैकी आठ पुरुष, तर सहा महिला आहेत. गुरुवारी झालेल्या मृत्यूंमध्ये ६० व त्यावरील दोन रुग्ण आहेत. तर नऊ रुग्ण हे ४० ते ५९ वयोगटातील आहेत. तीन रुग्ण ४० वर्षांखालील आहेत. दोन रुग्णांबाबत अन्य आजारांची माहिती मिळू शकली नाही. उर्वरित १२ मृत्यूंपैकी सात रुग्णांमध्ये ५८ टक्के मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आहेत.
पुणे विभागात १३५ रुग्णांची वाढ
विभागातील बाधितांची संख्या १ हजार ३१ झाली. बुधवारपेक्षा १३५ ने बाधित रुग्णसंख्या वाढली आहे. गुरुवारी दिवसभरात ४ जण मृत्युमुखी पडले. मृतांची एकूण संख्या ६५ झाली. १७२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. उपचार सुरू असलेले रुग्ण ७९४ आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १३ रुग्ण गंभीर आहेत.
मालेगाव शंभरीपार; नव्या बाधितांची नोंद
नाशिक : मालेगावात गुरुवारी (दि.२३) आणखी ५ पॉझिटिव्ह आढळल्याने रुग्णांची संख्या १०१ वर पोहोचली आहे. आतापर्यंत सुमारे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यानंतर पॉझिटिव्ह रु ग्णांचे शतक पूर्ण करणारा मालेगाव पहिला तालुका ठरला आहे.
विदर्भात १७१ रुग्ण
विदर्भातही रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गुरुवारी यवतमाळ जिल्ह्यात एकाच दिवशी नऊ जण आढळले. या जिल्ह्यात आतापर्यंत २७ रुग्णांची नोंद झाली. विदर्भात ही संख्या १७१ वर पोहोचली. सात दिवस रुग्णांची नोंद होणाऱ्या नागपुरात गुरुवारी एकही बाधित रुग्ण आढळून आलेला नाही.
वह्या पुस्तकांची तसेच पंखे व विजेची दुकाने उघडणार
देशातील काही राज्यांत लॉकडाउन उठल्यानंतर शाळा सुरू होण्याची शक्यता आणि वाढता उन्हाळा यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने वह्या-पुस्तकांची तसेच पंखे व काही विजेच्या उपकरणांची दुकाने सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली आहे.
याशिवाय शेतीसाठी लागणारी उपकरणे, बियाणे, खते यांची दुकानेही सुरू होतील. यामुळे शालेय विद्यार्थी तसेच पालकांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे. शेतकऱ्यांनाही त्यांची कामे सुरु करता येतील.
२६.९ लाख रुग्ण जगात
जगात कोरोनाच्या आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या २६ लाख ७५ हजार ८७६ झाली असून, मृतांचा आकडाही १ लाख ८८ हजार ८०४ वर गेला आहे. या आजारातून ७ लाख ३९ हजार जण बरे झाले असून, इतरांवर उपचार सुरू आहेत. अमेरिका (४७,८०८), इटली (२५,०००), स्पेन (२२ हजार ) आणि फ्रान्स २१ हजार ) या देशांत कोरोनाच्या बळींची संख्या मोठी आहे.
२३,०३९ रुग्ण देशात, ७२१ मृत्यू
देशात आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या २३ हजार ३९ झाली असून, त्यापैकी ५०१२ जण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र या आजाराने ७२१ जण मृत्युमुखीही पडले आहेत. सुमारे १६ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.