Coronavirus: राज्यात ७३० खाटांची ८ कोरोना रुग्णालये सुरू; कृषी उत्पन्न बाजार समितीचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 06:16 AM2021-05-16T06:16:06+5:302021-05-16T06:17:33+5:30
२२ बाजार समित्या रुग्णालये उभारणार, पारोळा, अहमदनगर, शेवगाव, बार्शी, मानवत, जिंतूर, सेलू आणि परभणी या आठ ठिकाणी रुग्णालये सुरू झाली आहेत.
अतुल कुलकर्णी
मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी राज्यात ७३० खाटांची ८ कोरोना रुग्णालये सुरू केली असून, आणखी तीन ठिकाणी २०० खाटांची रुग्णालये सुरू होत आहेत. पणन संचालक सतीश सोनी यांनी ही माहिती लोकमतला दिली. २२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी, कोविड सेंटर सुरू करण्याविषयी तयारी दर्शवल्याचेही त्यांनी सांगितले.
पारोळा, अहमदनगर, शेवगाव, बार्शी, मानवत, जिंतूर, सेलू आणि परभणी या आठ ठिकाणी रुग्णालये सुरू झाली आहेत. परळी, संगमनेर, श्रीरामपूर या तीन ठिकाणी २०० खाटांची रुग्णालये लवकरच सुरू होत असल्याचेही ते म्हणाले. खामगाव आणि भिवंडी या दोन बाजार समित्यांनी वैद्यकीय साहित्यासाठी २५ लाख रुपये दिले आहेत. राज्यामध्ये कोविडमुळे गंभीर परिस्थिती उद्भवली असून सर्वत्र रुग्णसंख्या प्रचंड वाढल्याने कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी विलगीकरण कक्ष, ऑक्सिजन बेड सुविधा उपलब्ध करून देणे, सॅच्युरेटेड ऑक्सिजन पुरवठा करावयाच्या मशिनचा पुरवठा करणे तसेच कोविडच्या उपचारांची निगडीत सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली असून त्याची सुरुवातही केली आहे.
बाजार समित्यांनी कोविड केअर सेंटरसाठी जागा उपलब्ध करून देणे, रुग्णांसाठी बेडची व्यवस्था, चहा-नाष्टा, जेवण, कोविड केअर सेंटरला बेड, ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा आदींबाबत बाजार समित्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सतत आढावा घेतला जात आहे.
राज्यामध्ये ३०६ कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. त्यांनी कोविड सेंटरची उभारणी करावी, असे आवाहन पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले होते. बाजार समित्यांनी पणन संचालकांकडे सरप्लस रकमेतून खर्चाची परवानगी मागितली होती. दहा लाखांवर सरप्लस असलेल्या १३७ बाजार समित्या असून, त्यांनी कोविड सेंटर सुरू करणे तसेच इतर कोविड सेंटरला अनुषंगिक सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. त्यामुळे अनेकांना उपचार मिळण्यास मदत होणार आहे. - सतीश सोनी, पणन संचालक