CoronaVirus: ...तर विनाअनुदानित शाळांवर दंडात्मक कारवाई, प्रसंगी मान्यता रद्द करणार, राज्यमंत्री बच्चू कडूंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 05:04 AM2020-06-26T05:04:35+5:302020-06-26T05:05:04+5:30
CoronaVirus: आवश्यकतेनुससार, त्यांची मान्यता रद्द करण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
सीमा महांगडे
मुंबई : पूर्व प्राथमिक ते दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत राज्याच्या शिक्षण विभागाने या वर्गातील मुलांसाठी आॅनलाइन शिक्षण नको, अशा सूचना केल्या. परंतु, खासगी विनाअनुदानित शाळा त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. हा शासन निर्णय नसून केवळ मार्गदर्शक सूचना असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, ज्या शाळा किंवा शिक्षणसंस्था या सूचनांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. आवश्यकतेनुससार, त्यांची मान्यता रद्द करण्याचा विचार केला जाईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
अनेक जिल्ह्यांतून पूर्व प्राथमिक ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण दिले जात असल्याच्या तक्ररी येत आहेत. पुण्यातील अशाच एका तक्रारीवर नुकतेच ते वर्ग बंद केल्याची माहिती राज्यमंत्र्यांनी दिली. या सर्वांवर नियंत्रण आणण्यासाठी लवकरच परिपत्रक काढून जिल्ह्यांना, शैक्षणिक संस्थांना देण्यात येईल. नियमांचे पालन सर्व शाळांनी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
>मनमानी खपवून घेतली जाणार नाही
शाळांनी शुल्कवाढ करू नये. सद्य:स्थितीत पालकांकडे शुल्क भरण्यासाठी तगादा लावू नये हे याआधीच शासन निर्णय व परिपत्रकांतून स्पष्ट केले आहे. शिक्षण विभागाच्या सूचनांना डावलून शाळा मनमानी करणार असतील तर त्यांना कारवाईला सामोरे जावेच लागेल, असा इशारा राज्यमंत्री कडू यांनी दिला.