Coronavirus : छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त वढू बुद्रुक व तुळापूर येथे होणारे सर्व कार्यक्रम रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 07:30 PM2020-03-17T19:30:14+5:302020-03-17T19:50:02+5:30
येत्या २४ मार्च रोजी वढु बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिन
कोरेगाव भिमा /लोणीकंद : छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त येत्या २४ मार्च रोजी वढु बुद्रुक व तुळापुर येथील आयोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यासह पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यातील विविध मंदिरे बंद , तसेच यात्रा, उत्सव, उरूस यांसारखे कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देतवढू बुद्रुक व तुळापूर येथील कार्यक्रम तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळाचे दर्शनही ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासन,ग्रामस्थ, उत्सव समिती यांच्या वतीने घेण्यात आला आहे.
श्री क्षेत्र वढू बुद्रुक व तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त शंभूराजांना मानवंदना देण्यासाठी दरवर्षी महाराष्ट्रासह विविध राज्यातुन अलोट गर्दी जमते. यात नाशिक, श्रीगोंदा व पुण्यातुन मोठ्या प्रमाणात शक्तिज्योतींचे आगमन होत असते. दुपारी शंभूराजांच्या समाधीवर व पूर्णाकृती पुतळ्यावर हेलिकॉप्टरव्दारे होणारी पुष्पवृष्टी व पोलीस दलामार्फत देण्यात येणारी शासकीय मानवंदना सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येतो. त्यावेळी मोठ्या प्रमाणात शंभूभक्त उपस्थित असतात.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात सर्व सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, उरूस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, नाट्यगृहे तसेच आदी गर्दीच्या ठिकाणांवर बंदी घालण्यात आलेली आहे. येत्या २४ मार्च रोजी वढु बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त लाखो शंभूभक्त येथे येण्याची शक्यता असल्याने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सदर पुण्यतिथी कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय ग्रामपंचायत , धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मृती समिती व ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आला असल्याची माहिती सरपंच रेखा शिवले यांनी दिली आहे, यावेळी पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सरपंच रेखा शिवले यांच्यासह उपसरपंच रमेश शिवले, माजी उपसरपंच संतोष शिवले , ग्रामपंचायत सदस्य सचिन भंडारे , धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज स्मृती समितीचे अध्यक्ष सोमनाथ भंडारे, शांताराम भंडारे, पोलीस पाटील जयसिंग भंडारे, पोलीस नाईक ब्रम्हा पोवार व ग्रामस्थ उपस्थित होते. त्याचबरोबर ३१ मार्च २०२० पर्यंत छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ दर्शनासाठीही बंद करण्यात आले असल्याचे सरपंच रेखा शिवले यांनी सांगितले आहे.
................
तुळापूर येथील सर्व कार्यक्रम रद्द
छत्रपती संभाजी महाराज याचा फाल्गुन वद्य आमावश्या मंगळवार दि. २४ मार्च रोजी होणारा श्री क्षेत्र तुळापूर येथील पुण्यतिथी चे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे . श्री क्षेत्र तुळापूर (ता.हवेली)येथे धर्मवीर संभाजी महाराज याचे स्फूर्तिस्थळ असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ३३२ वी पुण्यतिथी बलिदान स्मरण दिन म्हणून साजरा करण्यात येणार होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी येत्या २४ मार्च रोजी होणाºया पुण्यतिथीचे कार्यक्रमांचे सर्व नियोजन ग्रामस्थांच्या वतीने झाले होते. परंतु, आज मंगळवारी ( दि. १७) सरपंच रुपेश शिवले यांनी पत्रक प्रसिद्ध करुन क जिल्हाधिकारी तसेच जिल्हा प्रशासन निर्देशानुसार श्री क्षेत्र तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांची ३३२ वी पुण्यतिथी निमित्ताने होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे असल्याचे जाहीर केले आहे.
गेले महिनाभर माजी सरपंच गणेश पुजारी, उपसरपंच राहुल राऊत, ज्ञानेश्वर शिवले , संतोष शिवले, अमोल शिवले, राजाराम शिवले , नवनाथ शिवले , संजय चव्हाण आणि ग्रामस्थ तयारी करत होते. धर्मवीर संभाजी महाराज पालखी सोहळा समितीचे अध्यक्ष संदिपअप्पा भोंडवे म्हणाले कोरोनाचा प्रादूर्भाव , शासन निर्णय व पालखी सोहळा समिती यांच्याशी या बाबत चर्चा करण्यात आली .
छ. संभाजी महाराज बलिदान स्मरण दिनानिमित्ताने किल्ले पुरंदर येथुन पालखी सोहळा येणार होता. मात्र, तो संपूर्ण सोहळा रद्द करण्यात आला आहे. सकाळी मुक पदयात्रा सालाबादप्रमाणे निघणार असून त्यात मोजकेच कार्यकर्ते सहभागी होणार आहे. सरपंच रुपेश शिवले यांनी सांगितले, छ. संभाजी महाराज याची येत्या २४ मार्च रोजी पुण्यतिथी फक्त ग्रामपंचायत पदाधिकारी विधीवत पूजा अभिषेक करुन अभिवादन करतील.
लोणीकंद पोलीस निरीक्षक प्रताप मानकर म्हणाले, कोरोना व्हायरसच्या भीतीने राज्यभर खबरदारी घेतली जात आहे. पुण्यतिथी निमित्तानें श्री क्षेत्र तुळापूर व परिसरात कुठलेही कार्यक्रम होणार नाही. पोलिस यंत्रणा सज्ज आहे. नागरिकानी बाहेर न पडता सहकार्य करावे.दरम्यान परिसरातील सर्व जिल्हा परिषद शाळा , माध्यमिक विद्यालय व महाविद्यालये सुट्टी देण्यात आली आहे.