Coronavirus : निकाल वेळेत लागण्यासाठी शिक्षकांना घरून पेपर तपासणीला परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 03:39 PM2020-03-24T15:39:13+5:302020-03-24T15:43:58+5:30
Coronavirus : राज्य शिक्षण मंडळाकडून अटी / शर्ती ठेवून शिक्षकांना पेपर तपासणीसाठी मान्यता मात्र शिक्षकांमध्ये संभ्रम
मुंबई - दहावी आणि बारावीच्या पेपर तपासणीला उशीर होऊन निकाल लागण्यासाठी उशीर होऊ नये यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यात शाळा महाविद्यालयातील शिक्षकांना या आधीच सुट्टी देण्यात आली असल्याने उत्तरपत्रिकांचे परीक्षण आणि नियमन करण्यासाठी शिक्षकांना शाळा व महाविद्यालयात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाकडून हा निर्णय घेण्यात आला असून तो केवळ यंदाच्या या परीक्षेसाठीच लागू असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शिक्षक घरी घेऊन जाणाऱ्या उत्तरपत्रिका मोजून व सुस्थितीत असल्याची खातरजमा करून शिक्षकांनी मुख्याध्यापकांकडून किंवा कनिष्ठ महाविद्यालयाच्या संबंधित प्रमुखांकडून ताब्यात घ्यायच्या आहेत असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याचसोबत यांची तपासणी करताना या उत्तरपत्रिकांची गोपनीयता व सुरक्षितता राखली जाईल याची संबंधित शिक्षकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे अधोरेखित केले आहे. घरी उत्तरपत्रिका तपासणीसाठी नेल्यानंतरही त्या वेळेतच तपासून होणे बंधनकारक असणार आहे, त्यानंतर शिक्षकांनी त्या पुन्हा शाळाप्रमुख / कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रमुखांकडे हस्तांतरित करायच्या आहेत. घरी नेलेल्या तपासणीसाठीच्या उत्तरपत्रिकांमधील कोणतीही उत्तरपत्रिका खराब होणार नाही किंवा गहाळ होणार नाही याची जबाबदारी त्या शिक्षकाची असेल असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
coronavirus: कोरोना लॉक डाऊनमुळे राज्यसभेच्या निवडणुका रद्द, निवडणूक आयोगाची घोषणा https://t.co/XTKyQveSUr
— Lokmat (@MiLOKMAT) March 24, 2020
मात्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या या निर्णयामुळे शिक्षक संभ्रमात व चिंतेत असल्याचे मत संघटना व शिक्षक व्यक्त करत आहेत. राज्यात आता संचारबंदी लागू आहे. रेल्वे सेवा बंद असून प्रवास बंदी आहे. शाळेत न येण्याचे आदेश असल्याने काही शिक्षकही गावी गेले आहेत. शिवाय अनेक शिक्षक पेपर तपासणीसाठी पालघर, पनवेल, रायगड, विरार अशा ठिकाणहून येत असल्याने त्यांनी पेपर कलेक्शनसाठी कसे यावे हा मोठा प्रश्न आहे अशी प्रतिक्रिया शिक्षक परिषदेचे शिवनाथ दराडे यांनी दिली. यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला असल्याची माहिती त्यांनी दिली असून सरकारने योग्य तो निर्णय घेण्याची विनंती त्यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus: ‘या’ राज्यातील नागरिकांना मिळणार 1000 रुपये अन् मोफत धान्य
Coronavirus : ‘…तेव्हाही रेल्वे बंद केली नव्हती, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घ्या’
Coronavirus : महाराष्ट्रासह देशातील ‘या’ 30 राज्य-केंद्रशासित प्रदेशात 'लॉकडाऊन'
Coronavirus : कोरोनाला रोखणं आता तुमच्या हाती! WHO ने केलं भारताचं कौतुक