Coronavirus : म्हणून साथरोग नियंत्रण कायदा लागू - राजेश टोपे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 05:40 AM2020-03-16T05:40:11+5:302020-03-16T05:40:49+5:30
साथरोग नियंत्रण कायदा लागू झाला, म्हणजे राज्यात साथीच्या आजाराचा उद्रेक झाला, असा समज नागरिकांनी करून घेऊ नये. याउलट हा आजार रोखण्यासाठी या कायद्याच्या माध्यमातून अधिक प्रभावी उपाय योजण्यास मदतच होणार आहे
‘कोरोना’शी मुकाबला करण्यासाठी राज्य शासन सज्ज असल्याची ग्वाही देतानाच, साथरोग नियंत्रण कायदा लागू झाला, म्हणजे राज्यात साथीच्या आजाराचा उद्रेक झाला, असा समज नागरिकांनी करून घेऊ नये. याउलट हा आजार रोखण्यासाठी या कायद्याच्या माध्यमातून अधिक प्रभावी उपाय योजण्यास मदतच होणार आहे, एकंदरीतच प्रशासकीय यंत्रणेच्या सज्जतेबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी स्नेहा मोरे यांनी केलेली बातचीत...
उपचारासाठी कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत?
राज्यामध्ये सर्वच जिल्हा रुग्णालये, महापालिका रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये आणि काही खासगी रुग्णालयांमध्ये विलगीकरण (आयसोलेशन) कक्ष तयार करण्यात आले आहेत. राज्यात सुमारे ६५० ते ७०० खाटा या माध्यमातून विलगीकरणासाठी उपलब्ध झाल्या आहेत. शासनाच्या सूचनेनुसार चीन, इराण, इटली, द. कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या सात देशांतून प्रवास केलेल्या व्यक्तींना क्वॉरंटाइन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. एकांतवासातील रुग्ण पळून जाऊ नये, याकरिता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. विलगीकरण मान्य न करणाऱ्या रुग्णांना सक्तीने स्थानबद्ध करण्यात येईल.
साठेबाजांवर काय कारवाई केली?
मास्क आणि सॅनिटायझरची साठेबाजी करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. मुंबईत पश्चिम उपनगरात सॅनिटायझरसंबंधी तीन कारवाया, तर भिवंडी येथे मास्कसंबंधी कारवाई करण्यात आली आहे. केंद्र शासनानेही या संदर्भात अधिसूचना काढली असून, त्याद्वारे मास्क आणि सॅनिटायझरचा समावेश अत्यावश्यक वस्तू कायद्यामध्ये केला आहे.
प्रशासनाकडून काय उपाययोजना केल्या जात आहेत?
राज्यात अनावश्यक गर्दी टाळावी, यासाठी राज्य शासनाने सर्व शासकीय कार्यक्रम रद्द केले आहेत. पुढील निर्णय होईपर्यंत यात्रा, सभा,
समारंभ, परिषदा आयोजित करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या वतीने खासगी कंपन्यांनी कर्मचाºयांना घरातूनच काम करण्याची परवानगीची विनंती केली आहे.
कोरोना धोकादायक आहे का?
कोरोना हा विषाणूंचा समूह असून, सध्या ज्याचा प्रादुर्भाव जाणवत आहे तो ‘कोविड १९’ हा कोरोना विषाणू या समूहातील नवीन आहे. साधारणपणे या विषाणूची लागण झालेल्यांमध्ये मृत्यूचे प्रमाण अडीच ते तीन टक्के आहे. ज्यांची प्रतिकारशक्ती चांगली आहे, त्यांना याची लागण होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. साधारणपणे वयाची पन्नाशी उलटलेले आणि ज्यांना मधुमेह, रक्तदाब अथवा अन्य आजारांची लक्षणे आहेत, अशांमध्ये त्याची लागण पटकन होऊ शकते.
नागरिकांना काय आवाहन कराल?
नागरिकांनी कोरोनाच्या भीतीने घाबरू नये. स्वत:हून तपासणीसाठी रुग्णालयामध्ये गर्दी करू नये. पर्यटनस्थळे, धार्मिक ठिकाणी गर्दी करू नये. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरतात, त्यावर विश्वास ठेवू नये.
मास्क वापरणे गरजेचे आहे का?
सर्वसामान्यांनी मास्क वापरण्याची गरज नाही. हातरुमाल वापरणे पुरेसे आहे. कोरोना आजार हवेतून पसरणारा नाही, तो शिंकण्यातून आणि खोकण्यातून जे द्रव बाहेर पडते, त्याला हाताचा स्पर्श झाला आणि तो हात चेहºयावर, डोळे, नाक, तोंड येथे लागला, तर संसर्ग होऊ शकतो. हात साबणाने स्वच्छ धुवा, वारंवार चेहºयावर हात फिरवू नका. संभाषण करताना साधारणपणे समोरच्याशी तीन फुटांचे अंतर ठेवा, याचे पालन केल्यास सर्वच जण कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहू शकतात.