Coronavirus : गर्दी टाळा, नाहीतर लोकल होईल बंद, मुख्यमंत्र्यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 07:17 AM2020-03-18T07:17:13+5:302020-03-18T07:18:03+5:30
गरज नसेल तर घराबाहेर पडू नये, गर्दी टाळावी, तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर दुकाने मुंबईत बंद ठेवावीत
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कार्यालये बंद राहणार नाहीत. मुंबईतील लोकलसेवा, बससेवा सुरूच राहील. मात्र, लोकांनी घराबाहेर पडायचे टाळायला हवे. गर्दी ओसरली नाही, तर आम्हाला कठोर पावले उचलावी लागतील, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
गरज नसेल तर घराबाहेर पडू नये, गर्दी टाळावी, तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून इतर दुकाने मुंबईत बंद ठेवावीत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. जे करता येणे शक्य आहे, अशा सर्व उपाययोजना आम्ही करीत आहोत; पण सर्वांनी सहकार्य केले, तर संभाव्य धोका टळू शकतो. गर्दी होत राहिली, तर नाइलाजाने काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती बिघडल्यास लोकलसेवा बंद करावी लागेल, असे सूचित केले.
केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या किटचा वापर करूनच सर्व वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत. कारण या किट योग्यप्रकारे प्रमाणित करून आलेल्या असतात, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
उपस्थिती निम्म्यावर आणणार
सरकारी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती निम्म्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. कमी उपस्थितीत कार्यालयांमध्ये कामे कार्यक्षमतेने कशी करायची, याचा विचार केला जात आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले. खासगी कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये ५० टक्केच कर्मचाºयांची उपस्थिती ठेवावी आणि इतरांना घरून काम करायला सांगावे, असा आदेश राज्य शासनाने सोमवारीच दिलेला आहे.
राज्याचे प्रशासन ठप्प पडल्याचे दिसणे योग्य ठरणार नाही
मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत शासकीय कार्यालये आणि मुंबईतील लोकल बंद ठेवण्याबाबत चर्चा झाली, पण तसा निर्णय घ्यावा की नाही, यावरून मंत्र्यांनी वेगवेगळी मते व्यक्त केली. काही जण दोन्ही बाबी सुरू ठेवण्याच्या बाजूचे होते. मुख्य सचिव अजोय मेहता, मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांनी अनुक्रमे शासकीय कार्यालये व लोकलसेवा सुरू ठेवण्याचा आग्रह धरला, अशी माहिती आहे. सात दिवस कार्यालये बंद ठेवण्याने प्रशासनावर मोठा भार येईल. शिवाय प्रशासन ठप्प पडल्याचे चित्र दिसेल, ते योग्य होणार नाही, यावर शेवटी एकमत झाले.
कोरोनाचा पहिला बळी मुंबईत
मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा पहिला बळी गेला आहे. दुबईहून परतलेल्या एका ६३ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मंगळवारी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. मुंबई आणि पिंपरी-चिंचवड येथे प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ४१ झाली आहे.
दुबईहून ५ मार्च रोजी परतलेल्या ज्येष्ठ नागरिकास उच्च रक्तदाबाचा त्रास होता. हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाल्याने, त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
राज्यात मंगळवारी नव्या १०५ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. आतापर्यंत बाधित भागातून एकूण १,१६९ प्रवासी राज्यात आले आहेत.
१८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात ९०० जणांना भरती करण्यात आले आहे. यापैकी ७७९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह आले आहेत.
राष्ट्रीय रोग नियंत्रण संस्थेच्या पथकाने पुण्यात स्थितीचा आढावा घेतला.पथकप्रमुख डॉ. संकेत कुलकर्णी व राज्य साथरोग प्रतिबंध व नियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके यांनी मार्गदर्शनही केले.