१५ दिवसांत कोरोनाचा घेणार आढावा; ...तर दिवाळीनंतर वाजेल शाळांची घंटा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 07:36 AM2021-09-24T07:36:11+5:302021-09-24T07:38:10+5:30
राज्य शासनाला या आधीच चाइल्ड टास्क फोर्सकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्या त्या जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता स्थानिक प्रशासन आणि अधिकारी तेथील शाळा सुरू करण्यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ शकतील, शाळा सुरू करता येतील.
मुंबई : गणेशोत्सवानंतर अद्याप तरी रुग्णसंख्या फारशी वाढलेली नाही. पुढील १५ दिवसांत कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सूतोवाच चाइल्ड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. बकुळ पारेख यांनी गुरुवारी केले. राज्यात वेगाने होत असलेल्या लसीकरणामुळे तिसरी लाट थोपविण्यात यश येण्याची चिन्हे दिसत असताना आणि एकूणच तज्ज्ञ मंडळींचीही मते लक्षात घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरू होऊ शकतात.
राज्य शासनाला या आधीच चाइल्ड टास्क फोर्सकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्या त्या जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करता स्थानिक प्रशासन आणि अधिकारी तेथील शाळा सुरू करण्यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ शकतील, शाळा सुरू करता येतील. मात्र, त्याआधी लसीकरण, शाळांची स्वच्छता, आवश्यक उपाययोजना यांची अंमलबजावणी आवश्यक आहे. ज्या मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाला दिल्या गेल्या आहेत, त्याबाबतची तयारी करून राज्यभर एकत्रित शाळा सुरू करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने शाळा सुरू करणे योग्य ठरेल, असेही डॉ. पारेख यांनी सांगितले. दिवाळीनंतर शाळा सुरू होणार किंवा कसे यासंदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. परंतु, शिक्षण विभागाने लसीकरण पूर्ण झालेल्या शिक्षकांची माहिती मागवली असून, शाळा सुरू करण्याबाबतची तयारी सुरू केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
चाइल्ड टास्क फोर्सकडून ज्या मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाला दिल्या गेल्या आहेत, त्याबाबतची तयारी करून राज्यभर एकत्रित शाळा सुरू करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने शाळा सुरू करणे योग्य ठरेल.
- डॉ. बकुळ पारेख, सदस्य, चाइल्ड टास्क फोर्स