Coronavirus: महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी; राज्यातील 'हा' जिल्हा ठरला पहिला कोरोनामुक्त जिल्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 11:40 AM2021-08-06T11:40:47+5:302021-08-06T11:45:51+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ३९ हजार ८३२ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात ५९ हजार ८०९ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले होते.
भंडारा : एकमेव असलेला ॲक्टिव्ह रुग्ण शुक्रवारी कोरोमुक्त झाला. तर ५७८ चाचणीत एकही पाॅझिटिव्ह आढळला नसल्याने भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाला. दुसऱ्या लाटेनंतर कोरोनामुक्त होणारा भंडारा हा राज्यातील पहिला जिल्हा असावा.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जून महिन्यापासून कोरोना रुग्ण संख्या नियंत्रणात आली होती. जुलै महिन्यातर रुग्ण संख्या सिंगल डिजिटमध्ये आली होती. त्यातही तब्बल वीस दिवस एकही रुग्ण आढळून आला नाही. तर दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले. गत आठवड्यापासून जिल्ह्यात मोहाडी तालुक्यात एकमेव ॲक्टिव्ह रुग्ण होता. शुक्रवारी ५७८ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात एकही पाॅझिटिव्ह आढळून आला नाही. तर मोहाडी तालुक्यातील एकमेव रुग्ण कोरोनामुक्त झाला. त्यामुळे भंडारा जिल्हा शुक्रवारी कोरोनासमुक्त झाला आहे. राज्यात सर्वप्रथम कोरोनामुक्त होणारा भंडारा हा एकमेव जिल्हा असावा.
जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ३९ हजार ८३२ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात ५९ हजार ८०९ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले होते. त्यापैकी ५८ हजार ६७६ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर ११३३ व्यक्ती कोरिनाचे बळी ठरले. जिल्हा करोनामुक्त झाला असला तरी संभाव्या तिसऱ्या लाटेची प्रशासन जय्यत तयारी करीत आहे.
जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेतील समन्वय, तसेच नागरिकांचे सहकार्य यामुळे भंडारा जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. जिल्हा कोरोनामुक्त झाला तरी कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. -संदीप कदम जिल्हाधिकारी, भंडारा