Coronavirus: भाजपा प्रवक्त्याची जीभ घसरली; विनाकारण नरेंद्र मोदींवर टीका कराल तर...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 09:01 AM2020-03-31T09:01:35+5:302020-03-31T09:07:55+5:30
अवधूत वाघ हे एवढे असंवेदनशील असतील असे मला कधीच वाटले नव्हते, कोरोनाशी लढण्यासाठी यावेळेस सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.
मुंबई – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगावर थैमान घातलं आहे. जगातील १८० देशांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. इतकचं नाही तर भारतातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच महाराष्ट्रात कोरोनावरुन राजकारण करण्याची संधी भाजपा नेते सोडत नसल्याचं दिसून येतं.
भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ यांनी मंत्री जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इस्लामपूरमध्ये जे झालं ते वाईटचं, पण विनाकारण मोदींवर टीका केली तर शिक्षा भोगावी लागेलच’ असं उत्तर दिल्याने सोशल मीडियात अवधूत वाघ यांच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशात लॉकडाऊन जाहीर केले. पण लॉकडाऊनची घोषणा रात्री ८ वाजता करण्यात आली. त्यावरुन मंत्री जयंत पाटील यांनी लॉकडाऊन म्हणजे काय नोटबंदी नव्हे. सकाळी ही घोषणा करुन जनतेला तयारीसाठी वेळ द्यायला हवा होता असं मत मांडले होतं. त्यावरुन अवधूत वाघ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
अवधूत वाघ यांच्या वक्तव्याचा निषेध करत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, अवधूत वाघ हे एवढे असंवेदनशील असतील असे मला कधीच वाटले नव्हते, कोरोनाशी लढण्यासाठी यावेळेस सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. या संकटच्या काळात कोरोनाची बाधा झालेल्या कुटुंबातील व्यक्तींची काय अवस्था असेल हे समजून घेण्याचा अवधूत वाघ यांनी प्रयत्न करावा, परमेश्वर त्यांना येणाऱ्या काळात अधिक संवेदनशील बनवो असा टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनीही मुख्यमंत्र्यावर टीका केली होती. सध्या महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही, तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी असणाऱ्या प्रशासकाची म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांची गरज आहे, असे ट्विट डावखरे यांनी केलं होतं. यावरुनही सोशल मीडियात डावखरेंच्या वक्तव्याचा समाचार घेण्यात आला आहे. राजकारण आम्हाला पण येतं पण ही वेळ नाही असा घणाघात आमदार रोहित पवार यांनी भाजपावर केला होता.