राज्यात बूस्टर डोस मोहीम थंडावली; आतापर्यंत ३८ लाख नागरिकांनी घेतला लाभ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 07:15 AM2022-07-06T07:15:05+5:302022-07-06T07:15:29+5:30

कोरोनाची भीती गेल्याने बूस्टर डोस मोहीम थंडावली आहे. परंतु, कोरोना संसर्गाची तीव्रता सौम्य होण्याच्या दृष्टीने लसीकरण पूर्ण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Coronavirus: Booster dose campaign in the state cooled; So far 38 lakh citizens have benefited | राज्यात बूस्टर डोस मोहीम थंडावली; आतापर्यंत ३८ लाख नागरिकांनी घेतला लाभ

राज्यात बूस्टर डोस मोहीम थंडावली; आतापर्यंत ३८ लाख नागरिकांनी घेतला लाभ

Next

मुंबई : राज्यात कोरोनाच्या संसर्गानंतर आता परिस्थिती पुन्हा नियंत्रणात आली आहे. त्यामुळे कोरोनाचे भय कमी झाले असल्याने राज्यात कोरोना बूस्टर डोस मोहीम ही थंडावली आहे. राज्यात एकूण नऊ कोटीहून अधिक लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतला आहे, तर ७ कोटी ४८ लाख लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात आतापर्यंत ३८ लाख ४५ हजार लाभार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस घेतल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 

राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले, कोरोनाची भीती गेल्याने बूस्टर डोस मोहीम थंडावली आहे. परंतु, कोरोना संसर्गाची तीव्रता सौम्य होण्याच्या दृष्टीने लसीकरण पूर्ण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. साठहून अधिक वयोगटातील सुमारे २० लाख लाभार्थी बूस्टर डोससाठी पात्र आहेत. त्यातील केवळ ७.२५ लाख लाभार्थ्यांनी लसमात्रा घेतली आहे. राज्याचा विचार करता मुंबईत तीन लाख आणि पुण्यात सुमारे दोन लाख लाभार्थ्यांनी बूस्टर डोस घेतला आहे. 

दोन डोस घेतलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आलेला असल्यास त्यास तीन महिन्यांनंतर बूस्टर डोस दिला जाणार आहे. तर ६० वर्षांवरील सहव्याधीग्रस्त व्यक्तींना बूस्टर डोस घेण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांची संमती घेणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे नाही. दरम्यान, बूस्टर डोस घेतल्यानंतरही सर्वांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, गर्दीत न जाणे व हाताची स्वच्छता राखणे हे नियम पाळावेच लागतील.

राज्यात दिवसभरात तीन हजार नवीन कोरोनाबाधित 

राज्यात मंगळवारी ३ हजार ०९८ नवीन कोरोना रुग्णांचे निदान करण्यात आले आहे. यामध्ये सहा कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यात मुंबई, वसई विरार, पुणे, रत्नागिरी, सातारा आणि सोलापूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच, ४२०७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजपर्यंत एकूण ७८,२१,१४० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८९ टक्के एवढे झाल्याची माहिती राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिली. पाच जलैपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,२१,७८,५११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७९,८९,५११ (०९.७२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात एकूण २० हजार ८२० सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील मृत्यूदर १.८५ टक्के एवढा असल्याची माहिती राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिली.

 

Web Title: Coronavirus: Booster dose campaign in the state cooled; So far 38 lakh citizens have benefited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.