CoronaVirus मजुरांचे स्थलांतर राज्याला शोभा देणारं नाही, त्यापेक्षा...; छगन भुजबळांनी सुचवला उपाय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 09:04 PM2020-05-07T21:04:17+5:302020-05-07T21:12:12+5:30
उद्धव ठाकरे सरकारने काल कोरोनाच्या परिस्थितीवर कॅबिनेटची बैठक बोलावली होती. यावेळी मजुरांच्या स्थलांतराच्या प्रश्नांबाबत काल कॅबिनेटमध्ये वाचा फोडली.
नाशिक : कोरोना लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात अडकलेले मजूर माघारी जात आहेत. हे चित्र खूप विदीर्ण असून राज्याला शोभा देणारे नसल्याचे वक्तव्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या कॅबिनेटच्या बैठकीत आपण नाराजी व्यक्त केल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
ठाकरे सरकारने काल कोरोनाच्या परिस्थितीवर कॅबिनेटची बैठक बोलावली होती. यावेळी मजुरांच्या स्थलांतराच्या प्रश्नांबाबत काल कॅबिनेटमध्ये वाचा फोडली. याबाबतची भुजबळ यांची मुलाखत एबीपी माझाने घेतली. यामध्ये त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या निष्काळजीपणावर ताशेरे ओढले. कोरोना एक-दोन वर्षांचा सोबती आहे. कन्टोन्मेंट भाग सोडता उर्वरित राज्यातील दुकाने, उद्योग सुरु करायला हवे होते. सतत बदलणाऱ्या निर्णयांमुळे लोकांमध्ये संभ्रम पसरत आहे. मंत्र्यांकडे काहीच अधिकार नाहीत. कलेक्टर, कमिशनरला अधिकार आहेत. त्यांचे ते अधिकारच आहेत. पण प्रत्येक अधिकारी आपापले नियम लावत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने पत्रक पाठविले तर त्यात वेगळी डोकी लावली जात आहेत, असा आरोप केला आहे. सतत बदलणाऱ्या निर्णयांमुळं नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतोय, असे भुजबळ म्हणाले.
पंतप्रधानांनी लॉकडाऊन अचानक जाहीर केला ते चुकीचे होते. काही कालावधी द्यायला हवा होता. ट्रम्प येण्याआधीपासून कोरोनाची जगात सुरुवात झाली होती. चार दिवसांनंतर सारे बंद ठेवले जाईल. दोन महिने सर्व बंद ठेवणार आहेत हे सांगायला हवे होते. जेणेकरून अडकलेले हे मजूर गावी गेले असते. आता या मजुरांना उद्योग धंदे सुरु होतील याची शाश्वती द्यायला हवी, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले.
नागरिकांची सोय होणे गरजेचे...
राज्यात एसटी सुरु होणार आहेत. लोकांना घराची ओढ आहे. त्यांना कायद्याच्या कचाट्यात पकडू नये. कोरोनाचा प्रसार न होण्याची काळजी घ्यावी. प्रमाणपत्रासाठीही रांगा लागत आहेत. सोशल डिस्टंन्सिंगचा भारतात चुकीचा अर्थ लागतो. फिजिकल डिस्टन्सिंग हा शब्द योग्य आहे, असे ते म्हणाले. आपण सगळेच नवीन आहोत. माझ्या उभ्या आयुष्यात अशी लढाई पाहिली नाही, असे ते म्हणाले. दुकाने जास्त उघडी असतील आणि जास्त वेळ असेल तर लोक पांगतील. हे लक्षात घ्यायला हवे. अनुभवातून हे निर्णय घ्यावे, असे आवाहन अधिकाऱ्यांना केले आहे.
महत्वाच्या बातम्या...
अख्खा देश कोरोनाच्या धास्तीने घरात असताना परदेशी पर्यटकांकडून किनाऱ्यावर मौजमजा
SBI कडून लॉकडाऊनमध्ये मोठा दिलासा; कर्जाच्या व्याजदरात कपात
पाकव्याप्त काश्मीरमध्ये काहीतरी मोठे घडणार?; भारतीय हवामान विभागाचा इशारा
रहस्यमय...! भारतातील शेवटचे गाव; जिथे आजही महाभारतातील पूल अस्तित्वात
कल्याणमध्ये ऑनलाईन फूड डिलिव्हरी बॉयला कोरोना; आज २० रुग्ण सापडले