पवार म्हणतात ५ कोटी, भुजबळ ६ कोटी, राष्ट्रवादी म्हणते १ कोटी... कुणाची आकडेवारी खरी, कुणाची खोटी?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 03:01 PM2020-04-18T15:01:14+5:302020-04-18T15:11:57+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला धान्यवाटपाचा आकडा छगन भुजबळ आणि माहिती-जनसंपर्कने दिलेल्या आकड्यापेक्षा वेगळाच आहे.
कोरोना संकटाचा मुकाबला करताना, कुणीही रिकाम्या पोटी राहणार नाही, या उद्देशाने रेशन दुकानांमधून गहू, तांदूळ आणि साखर वितरणाचं काम राज्यभरात सुरू आहे. १७ एप्रिल रोजी राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून आलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, १ ते १७ एप्रिल या कालावधीत राज्यातील १ कोटी ४१ लाख ४३ हजार ६२६ शिधापत्रिका धारकांना तब्बल ४९ लाख ८६ हजार ३६५ क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आलं आहे. ही माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्याचंही या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय. परंतु, छगन भुजबळांनीच एका मुलाखतीत ६ कोटी ८० लाख नागरिकांना अन्नधान्यवाटप करण्यात आल्याचं सांगितलं आहे. त्याचवेळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दिलेला धान्यवाटपाचा आकडा तिसराच आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात आणि महाराष्ट्र भाजपानेही त्यावरून सरकारला लक्ष्य केलं आहे.
राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत ‘अंत्योदय’ व ‘प्राधान्य’ कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे. या लाभार्थ्यांना ५२ हजार ४२५ स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. सध्या रेशनवर अंत्योदय कार्डधारकांना २ रुपये किलो दराने गहू व ३ रुपये किलो दराने तांदूळ असे ३५ किलो धान्य वितरित केले जात आहे. केशरी कार्डधारकांना प्रतिव्यक्ती २ रुपये किलो दराने ३ किलो गहू व २ रुपये किलो दराने २ किलो तांदूळ वितरण होत आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे.
राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे सुरळीत वितरण. १ ते १७ एप्रिल दरम्यान १ कोटी ४१ लाख ४३ हजार शिधापत्रिकाधारकांना तब्बल ४९ लाख ८६ हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री @ChhaganCBhujbal यांची माहिती. pic.twitter.com/Iu3WWMEEo8
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 17, 2020
राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्यातर्फे या अन्नधान्य वाटपासंबंधीची आकडेवारी रोज प्रसिद्ध केली जाते. १ ते १५ एप्रिलदरम्यान १ कोटी ३५ लाख ५४ हजार शिधापत्रिकाधारकांना धान्यवाटप करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर पेजवरही हाच आकडा आहे आणि हे ट्विट छगन भुजबळ यांनी रिट्विटही केलं आहे.
हे ट्विट १५ एप्रिल रोजी ७.३५ वाजता करण्यात आलंय. पण त्याआधी त्याच दिवशी दुपारी १.४७ वाजता शरद पवारांनी एक ट्विट केलंय. त्यात आज पर्यंत ५ कोटी ९ लाख गरजूंना ३८ हजार क्विंटल धान्य वाटप झाल्याचं म्हटलंय. हे ट्विटही छगन भुजबळांनी रिट्विट केलंय. या दोन्ही ट्विटमधील धान्यवाटप झालेल्या नागरिकांच्या आकड्यात मोठी तफावत दिसतेय.
त्याचंच पुढचं पाऊल म्हणजे, छगन भुजबळांनी सामना दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत, १५ दिवसांत राज्यातील ६ कोटी ८० लाख नागरिकांना धान्यवाटप करण्यात आल्याचं म्हटलं आहे. हा आकडा आणखीच वेगळा आणि मोठा आहे.
प्रदेश भाजपानं या सगळ्या ट्विट्सचे स्क्रीन शॉट्स घेऊन राज्य सरकारला जाब विचारला आहे. महाराष्ट्र शासनाचा जनसंपर्क विभाग, सत्ताधारी पक्ष शिवसेनेचे मुखपत्र सामना व घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या तिघांनीही एकाच दिवशी नमूद केलेल्या आकड्यांमध्ये तफावत आढळते. ही महाराष्ट्राच्या जनतेची एकप्रकारची दिशाभूल नाही का?, असा सवाल त्यांनी केलाय.
महाराष्ट्र शासनाचा जनसंपर्क विभाग @MahaDGIPR, सत्ताधारी पक्ष @ShivSenaचे मुखपत्र @Saamanaonline व घटक पक्ष @NCPspeaks चे अध्यक्ष @PawarSpeaks या तिघांनीही एकाच दिवशी नमूद केलेल्या आकड्यांमध्ये तफावत आढळते.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 18, 2020
ही महाराष्ट्राच्या जनतेची एकप्रकारची दिशाभूल नाही का ? pic.twitter.com/AWdZW9mzp3
आता राज्य सरकार काय खुलासा करतं, हे पाहावं लागेल. कुणी दिलेली आकडेवारी खरी आणि कुणाची खोटी, याचा फैसला त्यावरूनही होऊ शकेल. कोरोना संकटाच्या काळात राजकारण न करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मात्र, अन्नधान्यवाटपाचे हे वेगवेगळे आकडे राजकारणाचाच भाग तर नाहीत ना, अशी शंकाही या निमित्ताने व्यक्त होत आहे.