Coronavirus: सोलापूरच्या 'आराध्या'चं खुद्द मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक; उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 03:05 PM2020-04-04T15:05:11+5:302020-04-04T15:09:45+5:30

आराध्याने आगळंवेगळं उदाहरण राज्यासमोर ठेवलं आहे.

Coronavirus: Chief Minister Uddhav Thackeray praises Solapur 7 year old girl name is Aradhya pnm | Coronavirus: सोलापूरच्या 'आराध्या'चं खुद्द मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक; उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण...

Coronavirus: सोलापूरच्या 'आराध्या'चं खुद्द मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक; उद्धव ठाकरेंनी सांगितलं कारण...

Next
ठळक मुद्देकाही ना काहीतरी खारीचा वाटा उचलतायेत त्या सर्वांचे आभार मानतोआपल्या घरातील वृद्ध लोकांची काळजी घ्यासोलापूरच्या चिमुकलीचं कौतुक करणार आहे. तिचं नाव आराध्य आहे

मुंबई – कोरोनाबाधितांच्या संख्येत राज्यात वाढ होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेला संबोधित केलं. १४ एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनचं लोक जबाबदारीने पालन करत आहे. पण यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्याला संबोधित करताना सोलापूरच्या एका चिमुकलीचं कौतुक केलं. त्याच कारणही तसं विशेष आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सुरुवातीला मी सोलापूरच्या चिमुकलीचं कौतुक करणार आहे. तिचं नाव आराध्य आहे. देशात, जगात आणि राज्यात लॉकडाऊन आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने संकटावेळी मदत करतोय पण या मुलीचं कौतुक यासाठी वाटतं कारण आज आराध्याचा वाढदिवस आहे, तिला राज्याच्या वतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो असं त्यांनी सांगितले.

तसेच हे वय हट्ट करण्याचं लाड पुरवून घेण्याचं आहे. पण आज आराध्याने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत केली आहे. आराध्याने आगळंवेगळं उदाहरण राज्यासमोर ठेवलं आहे. हीच महाराष्ट्राची वृत्ती आणि ओळख आहे. ही समज ७ वर्षाच्या मुलीमध्ये आली असेल तर हे युद्ध आपण जिंकलं असचं समजा अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तिचं कौतुक केले आहे.

यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कोरोनाची चाचणी केंद्र वाढवण्यात आली आहे. ५१ कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी गेलेत. दुर्दैवाने काही मृत्यू झालेत यात वृद्ध, आजारी व्यक्ती यांचा समावेश आहे. आपल्या घरातील वृद्ध लोकांची काळजी घ्या. त्यांच्यापासून अंतर राखणे, घराबाहेर जाऊ नये, हात स्वच्छ करुन त्यांची सेवा करा. सर्व देशात हीच काळजी घेतली जात आहे. दिल्लीत जे घडले ते महाराष्ट्रात होऊ दिलं नाही. राज्यात परवानगी मागण्यात आली पण कोरोनामुळे ही परवानगी नाकारली. जे दिल्लीतून राज्यात आले त्यांची यादी मिळाली यातील १०० टक्के लोकांचा शोध घेतला आहे. त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवलं आहे. येत्या काही दिवसात पुढील सूचना मिळेपर्यंत महाराष्ट्रात कोणताही राजकीय,क्रीडा आणि धार्मिक कार्यक्रमाला परवानगी दिली जाणार नाही असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

दरम्यान, कोरोनाविरुद्धच्या लढाईत अनेक हॉटेल्सने युद्धात लढणाऱ्या डॉक्टरांची राहण्याची सोय करतात. अनेक जण या कार्यात मदत करतायेत. काही ना काहीतरी खारीचा वाटा उचलतायेत त्या सर्वांचे आभार मानतो. मी माझ्या आवाहनात हात जोडतो, विनंती करतो हे शब्द वापतो. पण कोविड १९ सारखा आणखी एक व्हायरस समोर येत आहे. जनतेला वाचवण्यासाठी मी कोणत्याही थराला जाईन, नोटांना थुकी लावून व्हिडीओ पसरवले जात आहेत. जर कोणी जाणूनबुजून अफवांचे व्हायरस पसरवत असाल तर खबरदार, तुम्हाला सोडणार नाही. जनतेला मी कोविड पासून वाचवेन पण तुम्हाला कायद्यापासून कोण वाचवणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: Coronavirus: Chief Minister Uddhav Thackeray praises Solapur 7 year old girl name is Aradhya pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.