CoronaVirus: २ वर्षांपर्यंतच्या मुलांना मास्क नको, पण...; टास्क फोर्सच्या सदस्यांचे केंद्राच्या उलट मत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 09:51 AM2021-06-14T09:51:37+5:302021-06-14T09:52:50+5:30
Mask is must for 2+ years children's: पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना मास्कची गरज नसल्याचे केंद्राने म्हटले आहे परंतू दोन वर्षांपुढील मुलांनी शक्यतो मास्क लावावा, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाची तिसरी लाटेत लहान मुलांना धोका असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मुलांसाठी नवे नियम जारी केले आहेत. त्यानुसार पाच वर्षांपर्यंतच्या मुलांना मास्कची गरज नसल्याचे केंद्राने म्हटले आहे. मात्र, दोन वर्षांपुढील मुलांनी शक्यतो मास्क लावावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. (Mask is must for 2+ years children's: Task Force)
टास्क फोर्सच्या सदस्या डॉ. आरती किणीकर यांनी सांगितले की, २ वर्षांपर्यंतच्या मुलांना मास्क नको. पण २ वर्षांपुढील मुलांना शक्यतो मास्क लावावा असे स्पष्ट केले आहे. तर २ वर्षांपर्यंतच्या मुलांना मास्क लावल्याने श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. ते मास्क तोंडावर ठेवत नाहीत. त्यामुळे २ वर्षांपर्यंतच्या मुलांच्या पालकांनी-घरच्यांनी मास्क लावावा. त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांनी मास्क लावावा.
असे आहेत केंद्र सरकारचे नवे नियम
केंद्र सरकारने काेराेनासंदर्भात लहान मुलांसाठी नवे नियम जारी केले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे ५ वर्षांपर्यंतच्या मुलांना मास्क लावण्याची गरज नाही. ६ ते ११ वर्षांपर्यंतच्या मुलांनी मास्क लावावा, पण तो पालकांच्या देखरेखीखाली. तर ११ च्या पुढील मुलांना मास्कबाबत प्रौढांचेच नियम लागू असतील, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. त्याचवेळी १८ वर्षांखालील कोरोना रुग्णांना रेमडेसिविर वापरू नये, स्टेरॉईडचा वापर कमीत कमी, तोही केवळ गंभीर रुग्णांसाठीच करावा, औषधे योग्य अंतरानेच द्यावीत.