CoronaVirus News: राज्य सरकारकडून 'जगात भारी' प्लाज्मा सेंटर सुरू; मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 02:38 PM2020-06-29T14:38:11+5:302020-06-29T14:40:26+5:30
जगातील सर्वात मोठं प्लाज्मा सेंटर राज्य सरकारकडून सुरू
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी प्लाज्मा उपचार सुविधा केंद्राचं उद्घाटन केलं आहे. उद्या सरकारकडून मोठ्या प्लाज्मा उपचार केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती काल मुख्यमंत्री ठाकरेंनी जनतेला संबोधित करताना दिली होती. हे कदाचित जगातलं सर्वात मोठं प्लाज्मा केंद्र असेल, असंदेखील त्यांनी म्हटलं होतं. प्लाज्मा उपचार पद्धतीमुळे ९० टक्के रुग्ण बरे होत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकार या उपचार पद्धतीचा वापर करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.
मुंबईच्या लिलावती रुग्णालयात पहिल्यांदा प्लाज्मा उपचार पद्धतीचा वापर झाला. ती यशस्वी ठरली. त्यानंतर नायर रुग्णालयात आणखी एका रुग्णावर या पद्धतीचा वापर करण्यात आला. त्यानंतर सातत्यानं प्लाज्मा पद्धतीचा वापर केला जाऊ लागला. प्लाज्मा पद्धती दर १० पैकी ९ रुग्णांवर परिणामकारक असल्याचं सिद्ध झालं आहे. आजपासून ५०० रुग्णांवर प्लाज्मा पद्धतीनं उपचार केले जातील. यासाठी सरकारनं ७० कोटींचा खर्च केला आहे.
‘Project PLATINA’-World’s Largest convalescent plasma therapy trial cum treatment of severe COVID 19 patients was today launched by @Maha_MEDD & inaugurated by CM Uddhav Balasaheb Thackeray. pic.twitter.com/wkbRaoaEP6
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 29, 2020
काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी प्लाज्मा उपचार पद्धतीची माहिती दिली. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाज्माच्या मदतीनं बहुतांश कोरोना रुग्ण बरे होत आहेत. त्यामुळे कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी पुढे यावं आणि प्लाज्मा दान करावं, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं होतं. यावेळी त्यांनी रक्तदानाच्या आवाहनाला मिळालेल्या प्रतिसादाचा उल्लेख केला. कोरोना संकट येताच सुरुवातीला मी रक्तदान करण्याचं आवाहन केलं होतं. त्याला राज्यातल्या जनतेनं मोठा प्रतिसाद दिला. रक्ताचा तुटवडा दूर झाला. त्याचप्रकारे प्लाज्मा दान करण्याच्या आवाहनालाही प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
This is the World’s largest trial cum treatment project, which is to benefit 500 lives of critically ill COVID 19 patients in Maharashtra.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 29, 2020
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढते आहे. काल दिवसभरात राज्यात ५,४९३ कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या १,६४,६२६ वर पोहोचली. काल राज्यात कोरोनामुळे १५६ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील मृतांचा आकडा ७,४२९ वर पोहोचला. आतापर्यंत ८६,५७५ रुग्ण कोरोनातून बरे झाले असून ७०,६०७ जणांवर उपचार सुरू आहेत.
राज्यातल्या जनतेसाठी पुढे या; कोरोनातून बऱ्या झालेल्या हजारो जणांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन
लॉकडाऊन कायम राहणार, मात्र निर्बंध शिथिल होणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सूतोवाच