CoronaVirus News: जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री ठाकरेंकडून मोदींचा खास उल्लेख; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 09:49 PM2020-05-18T21:49:34+5:302020-05-18T21:54:00+5:30
आपल्या हिमतीवर महाराष्ट्र घडवू; मुख्यमंत्र्यांची जनतेला भावनिक साद
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्याच आठवड्यात कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी आत्मनिर्भर भारत पॅकेजची घोषणा केली. संकट हीच संधी असून आपण कोरोना संकटाचा वापर देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी करू, अशी साद मोदींनी घातली. यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातल्या जनतेशी संवाद साधताना पंतप्रधानांनी वापरलेल्या आत्मनिर्भर शब्दाचा खास उल्लेख केला. पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं आहे. त्यासाठी कोरोना संकट संपल्यानंतर सगळ्यांनी जोमानं कामाला लागायचं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातल्या जनतेशी संवाद साधला.
कोरोना रुग्णांची संख्या कमी असलेल्या ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. ग्रीन झोनमधले उद्योगधंदे सुरू केले गेले आहेत. या भागातील नागरिकांनी आता महाराष्ट्राला उभं करण्यासाठी पुढे यावं, अशी भावनिक साद मुख्यमंत्र्यांनी घातली. आतापर्यंत सरकारचं ऐकून नागरिक घरात राहिले. मात्र आता उद्योगधंदे सुरू झालेल्या भागातल्या लोकांनी घराबाहेर पडावं. राज्याला आत्मनिर्भर करण्यासाठी पुढाकार घ्यावा. आपला महाराष्ट्र लढवय्या असल्याचं दाखवून द्यावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
राज्यातले लाखो परप्रांतीय मजूर त्यांच्या राज्यांमध्ये परत गेले आहेत. महाराष्ट्रात असताना त्यांची उत्तम व्यवस्था सरकारनं केली. मात्र त्यांना घरी जायचं होतं. त्यासाठीही सरकारनं उत्तम नियोजन केल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं. परप्रांतीय कामगार, मजूर परतले असताना आता राज्यातल्या भूमिपुत्रांनी पुढे यावं. आपण आपल्या पायावर महाराष्ट्र उभा करू, अशी भावनिक साद मुख्यमंत्र्यांनी घातली. यावेळी त्यांनी आत्मनिर्भर शब्दाचा वापर केला.
लवकर लॉकडाऊन केल्यानं राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. लॉकडाऊन करण्यास उशीर झाला असता, तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती, असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील उद्योगधंदे हळूहळू सुरू करत असल्याची माहिती त्यांनी दिली. आतापर्यंत ५० हजार उद्योग सुरू करण्यात आले असून त्यात ५ लाख मजूर काम करत आहेत, अशी आकडेवारी त्यांनी सांगितली. कोरोनानंतर राज्यात येणाऱ्या उद्योगांसाठी ४० हजार एकर जमीन राखून ठेवण्यात आली आहे. ग्रीन उद्योगांसाठी कोणत्याही अटी असणार नाहीत. त्यांना कोणत्याही परवानगीशिवाय उद्योग सुरू करता येतील. कोरोनानंतर आपण राज्यात नवं उद्योगपर्व सुरू करू, असा आशावाद मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
... म्हणून मी लॉकडाऊन वाढवला, उद्धव ठाकरेंची नागरिकांना भावनिक साद
कोरोना चौकशीला आमचा पाठिंबा, पण...; चीननं सांगितली महत्त्वाची अट
चीनला हवीय भारतातील भाजी; कोरोनाचा सामना करताना वाढवणार रोगप्रतिकारशक्ती