CoronaVirus News: मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' घोषणांमुळे गोंधळ वाढला; फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 06:41 PM2020-06-12T18:41:57+5:302020-06-12T18:49:58+5:30
CoronaVirus News: माजी मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर टीका; कोरोना मृत्यूदर कमी करण्यासाठी उपाययोजना आखण्याची गरज व्यक्त
रत्नागिरी: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेल्या पुन:श्च हरीओम, मिशिन बिगिन अगेन यासारख्या घोषणांमुळे गोंधळ वाढल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी आधी पुन:श्च हरीओम म्हटलं. मग मिशन बिगिन अगेनची घोषणा दिली. त्यानंतर गरज पडली तर लॉकडाऊन करावा लागेल, असं विधान केलं. हे सगळं गोंधळात टाकणारं असल्याचं फडणवीस म्हणाले.
आम्ही जे काही सुरू करत आहोत, त्यात कितीही अडचणी आल्या तरी त्यांचा सामना करू, असं मुख्यमंत्र्यांनी निश्चयपूर्वक म्हणायला हवं होतं. अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्यासाठी लोकांना मदत करावी लागेल, असं फडणवीस यांनी म्हटलं. दापोलीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकारनं केलेल्या घोषणा कागदावरच असून त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. उपाययोजना प्रत्यक्षात लागू न झाल्या नसल्यानं कुठेही मदत मिळालेली नाही, असं म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी टीकास्त्र सोडलं.
ठाकरे सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यावर फडणवीस यांनी भाष्य केलं. 'मंत्र्यांना कोरोना झाला हे दुर्दैवी आहे. त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, अशी मी प्रार्थना करतो,' असं फडणवीस म्हणाले.
मुंबईतील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली. 'मुंबईतील परिस्थिती दिवसागणिक बिघडत चालली आहे. राज्यतील कोरोनो बाधितांची संख्या आता लाखावर जाईल. याकडे सरकारनं गांभीर्यानं पाहण्याची आवश्यकता आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूंवर नियंत्रण मिळवावं लागेल. यासाठी गरजेचे उपाय योजायला हवेत,' असं फडणवीस म्हणाले.
धनंजय मुंडे फायटर, ते लवकर बरे होतील; ब्रीच कँडीमध्ये उपचार; राजेश टोपेंकडून तब्येतीची माहिती
सावधान! 'या' महिन्यात भारतात कोरोना टोक गाठणार; वरिष्ठ डॉक्टरांकडून धोक्याचा इशारा
लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले...